‘शाळा’ चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला बरंच काही देणारा ठरला. आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटाचा नवा अध्याय लिहिताना या चित्रपटाने सुजय डहाकेंच्या रूपात दूरदृष्टी असलेला एक हुशार दिग्दर्शक सिनेसृष्टीला दिलाच, पण त्यासोबत केतकी माटेगावकरसारखी सुंदर आणि चाणाक्ष अभिनेत्रीही दिली. केवळ मराठी सिनेरसिकांच्या मनावर आपली मोहोर न उमटवता या चित्रपटाने देश-विदेशातील प्रेक्षकांनाही आपलंसं केलं. ‘शाळा’ आणि ‘आजोबा’ या दोन सिनेमांच्या यशानंतर दिग्दर्शक सुजय डहाके पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळले असून त्यांचा ‘फुंतरू’ हा आगामी मराठी सिनेमा लवकरचं प्रदर्शित होणार आहे. सुजय डहाकेंच्या सिनेमात पुन्हा एकदा अभिनेत्री-गायिका केतकी माटेगावकर प्रमुख भूमिकेत चमकणार ही या चित्रपटाची विशेष बाब आहे. या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यात नेहमीपेक्षा केतकीचा वेगळा लूक पाहावयास मिळतो. आतापर्यंत केतकी ही साध्या, सोज्वळ मुलीच्या भूमिकेत दिसली आहे. मात्र, यात केतकीची एक वेगळी बाजू पाहावयास मिळते.
phuntroo450
‘शाळा’नंतर ‘फुंतरू’च्या निमित्ताने सुजय आणि केतकी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. यामुळे प्रेक्षकांना पुनश्च सुजयचं उत्कृष्ट दिग्दर्शन आणि केतकीचा सहजसुंदर अभिनय पाहाण्याची संधी मिळणार आहे. ‘फुंतरू’ ही एक सायन्स फिक्शन लव्ह स्टोरी आहे. चित्रपटाच्या कथेबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात असून, वेळोवेळी कथेतील महत्त्वाचे पैलू उघड केले जाणार असल्याचे चित्रपटकर्त्यांचे म्हणणे आहे. चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी केतकी माटेगावकरसह मदन देवधर, म्हणजेच ‘बालक-पालक’मधल्या भाग्याची वर्णी लागली आहे.