भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार संदीप पाटील यांचा मुलगा चिराग हा लवकरच मराठी टेलिव्हिजनच्या पडद्यावर दिसणार आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘एक नंबर’ या मालिकेत तो अभिनय करणार आहे. या मालिकेत चिराग एका टारगट तरूणाची भूमिका साकारत आहे. ‘भारतीय’, ‘गुरूपौर्णिमा’ यांसारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाचा अनुभव असणारे गिरीश मोहिते हे ‘एक नंबर’चे दिग्दर्शन करणार आहेत. येत्या २२ जूनपासून ही मालिका टेलिव्हिजनवर प्रसारित होईल.
देव आणि वेदा या दोन मुख्य पात्रांभोवती ही मालिका केंद्रीत आहे. हे दोघेही तरूण, महत्त्वकांक्षी आणि स्वच्छंदीपणे जीवन जगणाऱ्या व्यक्तिरेखा आहेत. दरम्यान, या मालिकेसाठी अनेकजणांची ऑडिशन घेतल्यानंतर चिरागची निवड करण्यात आली. चिराग या मालिकेतील टारगट तरूणाच्या भूमिकेसाठी एकदम योग्य असल्याचे मोहिते यांनी सांगितले. मात्र, चिरागचा मुळचा स्वभाव खूपच शांत असल्यामुळे त्याला या भूमिकेसाठी विशेष मेहनत घ्यावी लागली. या मालिकेचे बजेट आणि तांत्रिक गोष्टी पाहता ही मालिका मराठी मालिकांचा चेहरामोहरा बदलणारी ठरेल, असा विश्वास दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी व्यक्त केला आहे.