आमच्या पुण्याच्या घरी दीड दिवसाचा गणपती आणतात. लग्नानंतरचा हा आमचा तिसरा गणपती. मुळात केवळ दीड दिवसांचा गणपती असल्यामुळे बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत आम्ही सर्वच त्याच्या तयारीला लागलेले असतो. गणपतीची संपूर्ण सजावट आम्ही सर्वजण मिळून करतो. ताज्या फुलांची आरास गणपतीच्या मकराभोवती केली जाते. यादरम्यान, मित्रमंडळी आणि नातेवाईकांची भेट होते त्यामुळे हा सण आमच्यासाठी गेट टूगेदरसुद्धा असतो. क्षितीसुद्धा बाप्पाचा नैवेद्य स्वतः करते. तिलादेखील गणपतीची खूप आवड आहे. घरच्यांसाठी नवीन कपड्यांची खरेदीही ती करते.
लहानपणापासून मला गणपतीचे वेड आहे. इतरांच्या घरी गणपतीची मूर्ती आणलेली बघितली की आपल्याही घरी गणरायाला आणावे असे वाटायचे. तेव्हापासून आम्ही दीड दिवसांचा गणपती आणायला लागलो. आमची मूर्तीदेखील ठरलेली आहे. दरवर्षी पेशवे प्रकाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही करतो. या दीड दिवसात मी कोणतेचं काम हातात घेत नाही. केवळ दीड दिवस बाप्पा आपल्या घरी येतो. तेव्हा त्याला आपण पूर्ण वेळ दिला पाहिजे असे मला वाटते. त्यामुळे अगदी किती महत्त्वाचे काम असले तरी मी ते हाती घेत नाही.