देशातील भ्रष्टाचार, भूमाफिया आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या इत्यादी गंभीर विषयावर भाष्य करणारा ‘गंगाजल २’ हा चित्रपट आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असल्याचे अभिनेत्री प्रियांका चोप्राने म्हटले आहे. अजय देवगणचा अभिनय असलेला २००३ सालच्या ‘गंगाजल’ या प्रसिद्ध चित्रपटाचा हा सिक्वल असून, प्रकाश झा दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. चित्रपटात आपण पोलिसाची भूमिका साकारत असल्याचे सांगत हा चित्रपट केवळ यातील भूमिकेमुळे नव्हे तर अजय देवगणने या आधीच्या चित्रपटात साकारलेली भूमिका आपण साकारत असल्याने आपल्यासाठी महत्वाचा असल्याची भावना तिने व्यक्त केली. ‘गंगाजल २’ चित्रपटाची कथा खूप छान असून, चित्रपटात नवीन विषयांवर भर देण्यात आल्याचे तिने सांगितले. चित्रपटात देशातील भ्रष्टाचार, भूमाफिया, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कशाप्रकारे लोकांना आपली जीवनयात्रा संपविणे भाग पडत आहे यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. प्रकाश झांविषयी बोलताना अभूतपूर्व अशी ही कथा केवळ प्रकाश झाच उत्तमरित्या चित्रपटाच्या माध्यमातून सांगू शकतात. चित्रपट प्रभाविपणे साकारण्याचे कसब त्यांच्याकडे असल्याचे तिने सांगितले. महिला पोलिसांना एव्हढे गंभीरपणे घेतले जात नसल्याबद्दल खेद व्यक्त कतर हा एक प्रासंगिक चित्रपट असल्याची माहिती तिने दिली. येत्या शुक्रवारी चित्रपटगृहात झळकणाऱ्या ‘दिल धडकने दो’ या झोया अख्तरच्या चित्रपटात प्रियांका दिसणार आहे.