मला तसे आपले बरेचसे पारंपारिक सण आवडतात. त्यात या नवरात्रौत्सवाचाही विशेष सहभाग आहेच. मी तरी हा सण विशेष उत्साहाने विचारात घेते. गरबा नृत्य संस्कृतीत भरपूर उर्जा सामावली आहे. माहिममध्ये लहानाची मोठी झाली असल्या कारणाने परिसरातील गुजराती बांधवांची गरबा संस्कृती पाहायला आवर्जून जायची. आता कलाकार म्हणून मला बऱ्याच ठिकाणी बोलावतात. एकदा इचलकरंजी येथे गेले असताना मी ‘पाहुणी’च तिकडे इतकी नाचले की, हिला आता थांबवा असे म्हणायची आयोजकांवर वेळ आली. एकदा मी बडोदा येथील गरबा नृत्य संस्कृतीचा विशेष अनुभव घेतला. ‘घटा’भोवती नृत्य करणे म्हणजे काय हे तेथे पाहायला मिळाले. या एकूणच नऊ दिवसात आतूनच कुठून तरी शक्ती येते असे वाटते. ‘स्त्री’ जसे देवत्व बहाल करण्यात आले आहे, त्याच वेळी दुसरीकडे पाहिले तर तिच्यावर दुर्देवाने अत्याचारदेखिल होताना दिसतात. स्त्रीचा एक माणूस म्हणून आदर ठेवला गेला पाहिजे असे मी या नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने सांगू इच्छिते.

अहमदाबादला जाऊन गरबा एन्जॉय करेन – मानसी मोघे 
सध्या मॉडेलिंग आणि बुगडी माझी सांडली ग या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने मी मुंबईत राहत असले तरी यावर्षी माझे सगळे लक्ष अहमदाबादच्या गरब्याकडे आहे. मला तेथून आमंत्रण आहेच, खरं तर गरबा हे गुजरातचे खरे कल्चर आहे. गरब्याचा रंग जमा दे तो मजा आ जाएगा… मी मुळची इंदूरची, तेथे गरबा खेळणारे बरेच जण आहेत. तेथे अगदी व्यवस्थत प्रॅक्टीस सरून मग प्रचंड उत्साहात गरबा खेळला जातो. संपूर्ण नऊ दिवस तेथे ‘हंगामा’ असतो. फुगे उडवले जातात. जोरदार वादन असते. सर्व वयोगटांचा तेथे ‘गरबा नाच’ होतो. मी अगदी कॉलेजमध्ये जाईपर्यंत गरबा नाचणे अत्यंत जरुरीचे आहे असे मानतच या सगळ्याचा भरभरून आनंद घेतला. नंतर नागपूरला मी हॉस्टेलमध्ये राहायचे, तेथे फारशी गरब्याची क्रेझ नाही. तेव्हा मात्र मी इंदूरच्या आठवणी काढत होते. आताही मला इंदूरचे ते गरब्याचे दिवस आठवतात.

क्षमता वाढवणारा गरबा… – आदिनाथ कोठारे
लहानपण दादरमधील पश्चिम अपार्टमेंटमध्ये गेल्याने सर्व प्रकारच्या सणांची ओळख आणि सहभाग नेहमीच उत्साहाने राहिला. गरबा तेव्हापासूनच आवडतो. शारीरिक क्षमता वाढवणारा असाच हा नृत्य प्रकार आहे. पूर्वी मी गरबा खेळायला जायचो. पण आता कलाकार म्हणून वावरताना ते शक्य होत नाही. इतकेच! पूर्वी मी फाल्गुनी पाठकच्या गरब्याचा प्रचंड चाहता होतो. तिनेच या नृत्याला ग्लॅमर आणले असे म्हणायला हवे. आता त्यात व्यावसायिकता वाढली आहे. त्याचा ‘इव्हेन्ट’ होत चालला आहे. पण त्यातील सांस्कृतिकता, सामाजिकता, बहुरंगीपणा आणि आनंद दुपटीने वाढला आहे. हे जास्त कौतुकाचे आहे.

‘गरबा’मध्ये खूप व्यावसायिकता आली – मीता सावरकर
गेल्या काही वर्षात चित्रपटापासून क्रिकेटपर्यंत सर्वच क्षेत्रात झपाट्याने बदल होऊन कमालीची व्यावसायिकता आली आहे. तर त्यापासून ‘गरबा संस्कृती’ दूर कशी राहिल? प्रायोजक, जाहिराती, तिकिट काढून गरबा पहा, सर्वोत्कृष्ट गरबा नृत्यकलाकाराला बक्षिस असे बरेच व्यवहारी प्रकार सुरू झाल्याने मी तरी गरब्यापासून दूर झाले. उपग्रह वाहिनीवर त्याचे थोडे फार दर्शन घेतले तरच अन्यथा आता माझे जास्त लक्ष हे जाहिरातपट, एखादी चांगली पटकथा, पुस्तक वाचन याकडे असते. पूर्वी पार्ल्यात राहत असताना आमच्या सोसायटीत नऊपैकी फक्त एक दिवस गरबा नाच असे. सभ्यता पाळून तो व्हायचा आणि त्यात मी तेव्हा सहभागी व्हायची. तेव्हा तो एक दिवसाचा आनंददेखिल खूप मोठा वाटे.

विशेष क्रेझ नाही – प्रिया बापट
नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने केले जाणाऱ्या गरबा नृत्य संस्कृतीचे मला थोडे फार आकर्षण आहे. पण मी स्वत: त्यात फारसा सहभाग घेत नाही. यामागे काही विशेष कारण असेच काही नाही. शिवाजी पार्क परिसरात लहानाची मोठी होऊनदेखिल गरबा संस्कृतीमध्ये मी फारशी रमले मात्र नाही. इतक्या वर्षात, फार फार तर दोन-तिनदाच मी गरबा पाहायला कुठे तरी गेले असेन. एका वर्षी आदेश बांदेकरने कामगार क्रिडा मैदानावर आयोजित केलेल्या ‘मराठी कलाकार गरबा’ खेळायला गेले होते. पण ते तेव्हढ्यापुरतेच! अर्थात, मला त्याची फारशी आवड नसली तरी, ज्याना त्याचा भरभरून आनंद घ्यायचा आहे, ते घेऊ देत. माझी ‘हॅपी जर्नी’ मी माझ्या पध्दतीने एन्जॉय करते, इतकेच.