पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीस मराठी साहित्य संमेलनाचे वारे हळूहळू घुमू लागले असून संमेलनाला जाऊ इच्छिणाऱ्या वाचक-रसिकांची संख्याही वाढू लागली आहे. परीक्षांचे दिवस आणि महाराष्ट्रापासून दूर असतानाही नागपूर-विदर्भातून चांगल्या संख्येने रसिक मराठी साहित्य विश्वाच्या उत्सवाला हजेरी लावण्यासाठी जात आहेत.
संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या घुमानला ३ ते ५ एप्रिलदरम्यान साहित्य संमेलन होत आहे. अमराठी मुलखात व घुमानसारख्या तुलनेने लहान ठिकाणी संमेलन आयोजित करण्यात आलेल्या महामंडळ व राज्यभरातील प्रकाशक यांच्यात वाद निर्माण झाला. प्रकाशकांनी या संमेलनावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले व त्या वादाचा शिमगा आजतागायत सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत घुमानला जायचे नाही यावर बहुतांश प्रकाशक ठाम असताना संमेलनात हजेरी लावू इच्छिणाऱ्या साहित्यप्रेमींची संख्या मात्र दरवर्षीपेक्षा जास्त असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विदर्भ साहित्य संघाकडे आजवर संमेलनास जाण्यास उत्सुक असणाऱ्या १६० जणांनी नोंदणी केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी तीन हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. या वाचक रसिकांमध्ये प्रामुख्याने नागपूर शहराचा सर्वाधिक वाटा आहे. त्या शिवाय, विदर्भातील विविध ठिकाणांहूनही लोक संमेलनासाठी जात आहेत व साहित्य संघाकडे तशी नोंदणी त्यांनी केली आहे. या व्यतिरिक्त स्वतंत्रपणे घुमानला जाणाऱ्या वाचकांमुळे या संख्येत भर पडणार आहे.
नागपूरहून घुमानचे अंतर बरेच असल्याने व ऐन परीक्षेच्या कालावधीत संमेलन होत असल्याने जाणाऱ्यांच्या संख्येवर परिणाम होत आहे. विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन स्तरावरील इच्छुक प्राध्यापक वर्गाच्या उत्साहावर परीक्षांमुळे विरजण पडले आहे. एरवी साहित्य वतुर्ळात वावरणाऱ्या व साहित्यिक कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या प्राध्यापक मंडळींच्या घुमान वारीवर परीक्षेच्या वेळापत्रकामुळे विरजण पडले आहे. दरवर्षीपेक्षा साहित्य संमेलनाला जाणाऱ्यांचे प्रमाण यंदा जास्त आहे, असा दावा केला जात असला तरी संमेलनाबाबत हवी तशी वातावरण निर्मिती अद्याप झाली नसल्याचे मत साहित्य वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.

विदर्भाच्या तुलनेत इतरत्र उत्साह जास्त असून पुणे, नांदेड, हैदराबाद यांसह राज्यातील व राज्याबाहेरील मराठी वाचक-रसिक संमेलनाला अधिक संख्येने जात असल्याचेही सांगण्यात आले आहे. माध्यमांमधून संमेलनाची हवा तापल्यानंतरच खरी गर्दी होत असते पण यंदा असे वेळेवर जाणे शक्य होणार नसल्याने त्याचाही संमेलनातील सहभागींच्या संख्येवर परिणाम होणार आहे. जास्त अंतर आणि परीक्षांचा काळ हे दोन घटक नसते तर घुमानला हजेरी लावणाऱ्यांची संख्या अधिक राहिली असती. तरीही प्रकाशकांनी बहिष्कार टाकला असताना वाचक व साहित्यप्रेमी मात्र संमेलनाला हजेरी लावत असल्याचे प्राथमिक चित्र उत्साहवर्धक आहे, असे मत साहित्यक्षेत्रातून व्यक्त होत आहे.