भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी यांनी बुधवारी ट्विटरवरून दौसा अपघातप्रकरणात स्वत:ची बाजू मांडली. त्या मुलीच्या वडिलांनी वाहतुकीचे नियम पाळले असते, तर त्या लहान मुलीचा जीव वाचला असता, असा दावा हेमामालिनी यांनी केला आहे. अपघातानंतर इतर जखमींच्या तुलनेत हेमामालिनींना तातडीने उपचार मिळाल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. या टीकेचाही हेमामालिनी यांनी ट्विटसच्या माध्यमातून समाचार घेतला आहे. अपघाताच्या धक्क्यातून मी सावरले नसतानाच माझ्यावर करण्यात आलेला टीकेचा प्रयत्न निंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी झालेल्या या अपघातात हेमामालिनी यांच्या मर्सिडीज आणि अल्टो गाडीची समोरासमोर टक्कर झाली होती. यामध्ये अल्टो कारमधील चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले होते. या अपघातात हेमामालिनीदेखील जखमी झाल्या होत्या.