मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात शिक्षा झालेला चित्रपट अभिनेता संजय दत्त याला वारंवार तुरुंगातून बाहेर येण्याची सवलत मिळते. अन्य आरोपींना मात्र तशी सुट्टी दिली जात नाही. संजयलाच वेगळा न्याय का? त्याला १४ दिवसांचा ‘फर्लो’ कसा मंजूर झाला, याची चौकशी करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे.
दत्त याला मंगळवारी १४ दिवसांची मिळाली. बॉम्बस्फोट खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा वैध ठरविल्यावर त्याची रवानगी तुरुंगात झाली. तरीही दीड वर्षांत तो तीन ते चार महिने बाहेर होता. भाजप सरकार सत्तेत येताच पुन्हा एकदा त्याला सवलत मिळाली. यामुळेच सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतली असून, संजयलाच वारंवार सुट्टी कशी दिली जाते याची चौकशी करण्याचा आदेश कारागृह विभागाच्या महानिरीक्षकांना दिल्याचे गृहराज्यंमत्री राम शिंदे यांनी सांगितले. शिक्षा झालेल्या पाच ते सहा जणांनी फर्लो सुट्टीसाठी अर्ज केला होता. पण फक्त संजय दत्तलाच का वेगळा न्याय दिला गेला याची चौकशी झाली पाहिजे, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. संजय दत्तलाच का वारंवार सुट्टी मिळते, असा प्रश्नही गृहराज्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.