महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास २’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केली आहे. सगळीकडे हाऊसफुल्ल गर्दीत सुरू असलेल्या या चित्रपटाने शुक्रवारी ३ कोटी ८० लाख रुपये गल्ला जमवला असून, मराठी चित्रपटांच्या तिकीटबारीवरील यशाची कमान चढतीच राहिली आहे, अशा शब्दांत चित्रपटाचे निर्माते एस्सेल व्हिजनचे व्यवसायप्रमुख निखिल साने यांनी आपला आनंद व्यक्त केला. चार दिवसांच्या लागोपाठ आलेल्या सुट्टीचा मुहूर्तही ‘टाइमपास २’ला फळणार असून, चित्रपट ५० कोटींचा आकडा पार करेल, अशी अटकळ बांधली जात आहे.
प्राजक्ता आणि दगडूच्या प्रेमाची पुढची कथा घेऊन आलेला ‘टाइमपास २’ हा चित्रपट सगळीकडे हाऊसफुल्ल गर्दीत सुरू आहे. प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाला भरभरून प्रेम दिले असल्यानेच ‘टाइमपास २’ला हे यश मिळवणे शक्य झाले आहे.