काही कलाकारांचे अस्वस्थपण काही वेगळेच असते, किरण करमरकर तसाच आहे. फार पूर्वी त्याने ‘निष्पाप’, ‘यज्ञ’ अशा काही मराठी चित्रपटातून भूमिका साकारल्या. अलीकडे तो ‘आरोही’, ‘गोष्ट तिघांची’, ‘भातुकली’ अशा काही चित्रपटातून दिसला. आता ‘जाणीव’ या चित्रपटातून दिसेल. पण तरी त्याला आपले मराठी चित्रपटातील कामाचे प्रमाण खूपच कमी आहे असे वाटते आणि त्यामागचे कारणदेखील त्याच्या लक्षात येत नाही. पण संगीत कुलकर्णी दिग्दर्शित ‘क्षणोक्षणी’ हा चित्रपट अद्यापही प्रदर्शित न झाल्याचे त्याचे दु:ख आहे. कारण त्या चित्रपटाच्या निर्मितीच्या काळातच त्यांच्या लक्षात आले की आपली भूमिका आपल्याला उत्तम सापडली आहे. इतकेच नव्हे तर, राज्य चित्रपट महोत्सवात त्यास सहाय्यक अभिनेत्याचे सर्वोत्तम पारितोषिकही मिळाले. पण दुर्देवाने त्याच्या या यशाची फारशी कोणीच दखल घेतली नाही. इतकेच नव्हे तर हा ‘क्षणोक्षणी’ चित्रपटदेखील प्रदर्शित होऊ शकला नाही. आपल्या अतिश्य चांगल्या कामाची अशी अवस्था व्हावी याचे किरण करमरकरला क्षणोक्षणी दु:ख होते.