प्रादेशिक वाहिन्या म्हणजे प्रत्येक राज्यातील प्रांतीय भाषेतील प्रेक्षकांना आपल्याकडे पकडून ठेवण्यासाठीचे एक साधन अशी हिंदी वाहिन्यांची आतापर्यंतची धारणा होती. त्यामुळे आपल्या मूळ हिंदी वाहिन्या आणि त्यांच्यावरील मालिकांना प्राधान्य देऊन त्यांच्या टीआरपीचा आलेख वाढता ठेवण्याची खबरदारी वाहिन्यांच्या समूहाकडून घेण्यात येत होती. गेल्या दोन ते तीन वर्षांचा या प्रादेशिक मालिकांचा वाढता आलेख आणि त्यांच्याकडील प्रेक्षकसंख्या लक्षात घेता या वाहिन्यांची दखल घेणं आता हिंदी वाहिन्यांना भाग पडू लागलं आहे. काही वर्षांचा आलेख पाहता हिंदीमध्ये प्रादेशिक मालिकांच्या कथानकावर आधारित मालिका येत आहेत. ‘झी टीव्ही’ तर ‘झी मराठीवरील’ दोन मालिका डब करून वाहिनीवर दाखविणार आहेत. प्रादेशिक मालिकांमध्ये दिसणारी वेगळी संस्कृती आणि हलक्याफु लक्या कथानकातील आपलेपणा हिंदी वाहिनीच्या प्रेक्षकांनाही आवडू लागला असल्याने या मालिकांना एक मोठे दालन खुले झाले आहे.
भारतामध्ये प्रादेशिक वाहिन्यांची सुरुवात होऊन एक तपापेक्षा अधिक काळ लोटला. प्रादेशिक वाहिन्यांनी त्यांची सुरुवात शून्यापासून केली होती. त्यामुळे या प्रादेशिक वाहिन्यांनी त्यांच्या भाषेतील साहित्याची मदत घेतली. विशेषत: मराठी वाहिन्यांच्या सुरुवातीच्या काळात कित्येक गाजलेल्या कादंबऱ्यांवर आधारित मालिकांची निर्मिती केली गेली. याकाळात हिंदी मालिकांनी पुढचा टप्पा गाठला होता. सासू-सून, नणंद-भावजया या घरामधील संवेदनशील नात्यांना हाताशी घेऊन दैनंदिन मालिकांची मोठी मेजवानी त्यांनी प्रेक्षकांना देऊ केली. बालाजी टेलीफिल्म्सच्या अंगाखांद्यावर खेळत मोठय़ा झालेल्या मालिकांनी एकता कपूरला घराघरांत परिचयाचे केले. टीव्हीवरील मालिकांची लांबी वाढण्यास आणि त्यांच्या पात्रांना स्टारडम मिळण्याचा हा काळ होता. वाट चाचपडणाऱ्या प्रादेशिक मालिकांच्या तुलनेत सहाजिकच हिंदी वाहिन्यांचे पारडे जडच होते. दरम्यान, कित्येक हिंदी मालिकांचे कथानक अगदी जसेच्या तसे उचलून प्रादेशिक मालिकांमध्ये दाखविण्यास सुरुवात झाली होती. ‘बिग बॉस’, ‘कौन बनेगा करोडपती’, ‘नच बलिये’सारखे शोही प्रादेशिक वाहिन्यांवर आले. पण, त्यानंतर हिंदी वाहिन्यांनी मात्र आपल्या मालिकांच्या साच्यात बदल करण्याची तसदी घेतली नाही. सासू-सुनांच्या त्याच सूत्रामध्ये अजूनही मालिका अडकून पडल्या आहेत. त्यामुळेच हिंदीचा प्रेक्षक आता या मालिकांना कंटाळला असून नवं काही शोधू लागला आहे. प्रादेशिक मालिकांच्या कथानकावरील हिंदी मालिका
सध्या प्रादेशिक वाहिन्यांना ५० टक्क्याहून अधिक प्रेक्षकसंख्या मिळते आहे. यामध्ये तामिळ वाहिन्यांचा क्रमांक पहिला लागतो. त्यानंतर मराठी, तेलगु वाहिन्यांचा क्रमांक आहे. २०१२च्या तुलनेत २०१३मध्ये या वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येमध्ये ३५ टक्क्यांनी वाढ झाली होती. येत्या काळात ही संख्या अधिकच वाढणार आहे. आज कित्येक प्रादेशिक मालिकांच्या कथानकावरून हिंदी मालिका तयार करण्यास सुरुवात झाली आहे.rv04 सुरुवातीच्या काळात तामिळ मालिका ‘लढायम’च्या कथानकावर आधारित हिंदीमध्ये ‘दिल से दिया वचन’ या मालिकेची निर्मिती करण्यात आली होती. ‘तिरुमाथी शेरम’ या तामिळ मालिकेच्या कथानकावरून हिंदीमध्ये ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका सुरू करण्यात आली होती. बालाजीच्या या मालिकेने बॉलीवूडला सुशांत सिंग राजपूत हा नवा चेहरा दिलाच पण, कित्येक वर्ष ही मालिका सर्वाधिक टीआरपी गोळा करत होती. काही महिन्यांपूर्वी ‘झी टीव्ही’ने ‘होणार सून मी या घरची’ या मराठी मालिकेची लोकप्रियता लक्षात घेत त्याच कथानकावर हिंदी मालिका आणण्याचा निर्णय घेतला. ‘सतरंगी ससुराल’ ही मालिका सध्या वाहिनीवरील सर्वाधिक टीआरपी मिळविणारी मालिका म्हणून गणली जाते. यापुढे जाऊन वाहिनीने ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ आणि ‘जुळून येती रेशीमगाठी’ या दोन मालिका डब करून हिंदीत आणण्याचा निर्णय घेतला आहे.  
 उत्तम कथानक हेच बलस्थान
 प्रादेशिक मालिकांमधील उत्तम कथानक हे त्यांना हिंदीमध्ये आणण्यामागे सर्वात मोठे कारण असल्याचे ‘झी टीव्ही’चे बिझनेस हेड प्रदीप हेजमाडी यांनी सांगितले. हिंदीमधील मालिकांमध्ये अजूनही अतिरंजकपणाला महत्त्व दिले जाते. पण, त्या तुलनेत प्रादेशिक मालिका हलक्याफुलक्या असतात.
संस्कृतीतील आपलेपणा भावतो
सुरुवातीला या मालिकांच्या कथानकावर नवीकोरी मालिका बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, आता संपूर्ण मालिका डब करून हिंदीमध्ये आणली जात आहे. यामध्ये मालिका निर्मितीच्या खर्चात होणारी बचत हे एक कारण असले तरी त्यासोबतच मूळ मालिकेत दिसणारी त्या प्रादेशिक संस्कृतीची झलक प्रेक्षकांना अधिक भावत असल्याचे चित्र आहे. संपूर्ण मालिका डब करून हिंदीमध्ये आणण्याआधी गुजरात, राजस्थानच्या छोटय़ा भागांमध्ये या मालिकांचे काही भाग प्रसारित करण्याचा प्रयोग वाहिनीतर्फे करण्यात आला होता. तेव्हा या मालिकांबद्दल प्रेक्षकांना कुतूहल असल्याचे दिसून आले. ‘आपल्याकडे प्रत्येक संस्कृतीनुसार चालीरीती, पद्धती बदलतात. महाराष्ट्रातील सून लग्न झाल्यावर घरी कशी वावरते, याचं कुतूहल बिहारमधील महिलांना असतं, हे या प्रयोगातून दिसून आल्याचे हेडमाजी सांगतात. त्यामुळे मालिका पुन्हा बनविण्यापेक्षा डब करण्याचा निर्णय घेतला गेल्याचं त्यांनी सांगितलं. अर्थात, यावेळी प्रेमकथांना मिळणारा प्रेक्षकवर्ग पाहता सर्वप्रथम प्रेमकथांवर भर दिला गेला आहे. सध्या या मालिकांचे प्रमाण कमी असले तरी त्यांचा प्रेक्षकवर्ग पाहता भविष्यात प्रादेशिक मालिका टीव्हीवर सत्ता गाजवणार असं म्हणायला हरकत नाही.