महाराष्ट्र राज्य शासनातर्फे आयोजित केली जाणारी राज्य नाटय़ स्पर्धा गेली ५४ वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. ही स्पर्धा मराठी रंगभूमीच्या इतिहासाची साक्षीदार असून राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने तयार केलेल्या ‘रंगवैभव’ या ध्वनिचित्रफितीमधून स्पर्धेचा आणि मराठी रंगभूमीचा हा इतिहास उलगडला गेला आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनायाचे संचालक अजय आंबेकर यांच्या संकल्पनेतून ‘रंगवैभव’तयार झाले आहे. राज्य नाटय़ स्पर्धेचा हा इतिहास दस्तवेजीकरणाच्या स्वरुपात जतन केला जाऊन तरुण पिढीपुढे सादर केला जावा, या उद्देशाने ही ध्वनिचित्रफीत तयार करण्यात आली असून याचे निवेदन व चित्रीकरण प्रसिद्ध निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी केले आहे. मराठी रंगभूमीच्या सुरुवातीच्या इतिहासापासून ते आत्ताच्या नाटकांपर्यंतच्या रंगभूीच्या विविध कालखंडांचा आढावा यात घेण्यात आला आहे.
‘रंगवैभव’ या ध्वनिचित्रफीतीसाठी तब्बल सहा तासांचे ध्वनिचित्रमुद्रण करण्यात आले असून ती सहा भागांमध्ये आहे. मराठी रंगभूमीची सुरुवात कशी झाली याचा मागोवा पहिल्या भागात घेण्यात आला असून दुसऱ्या भागात राज्य नाटय़ स्पर्धेची सुरुवात त्यापुढील भागात राज्य नाटय़ स्पर्धेचा विस्तार, प्रादेशिक केंद्रे, नेपथ्य, प्रकाश, दिग्दर्शन यांचा विकास याची माहिती आहे. शेवटच्या दोन भागात १९८० पूर्वी आणि नंतर स्पर्धेत सादर झालेल्या काही निवडक नाटकांचा आढावा घेण्यात आला असून यात ‘चंद्र नभीचा ढळला’, ‘घाशिराम कोतवाल’, ‘महानिर्वाण’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’ आदी नाटकांचा समावेश आहे.
ध्वनिचित्रफितीमध्ये विजया मेहता, माधव वझे, कमलाकर सोनटक्के, कमलाकर नाडकर्णी, बापू लिमये, प्रशांत दळवी, जयंत पवार, अरुण नलावडे, पुरुषोत्तम बेर्डे आणि अन्य रंगकर्मी यांचे मनोगत आहे. रंगभूमीचा हा इतिहास घडविताना नरेंद्र बेडेकर यांना आर. टी. देशमुख यांनी काढलेल्या छायाचित्रांचीही मोलाची मदत झाली. त्या काळात देशमुख यांनी कोणताही मोबदला न घेता केवळ हौस म्हणून नाटकांची छायाचित्रे काढली होती. या छायाचित्रातून मराठी रंगभूमीचा इतिहास जमा झाला आहे.
रविवार ५ जुलै रोजी याचे प्रसारण ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवरुन सकाळी ११.३०, दुपारी १.३० संध्याकाळी ५.३० आणि रात्री ८.३० वाजता या ध्वनिचित्रफितीचे प्रसारण करण्यात येणार आहे.