मराठमोळे सौंदर्य आणि शालीनतेचे प्रतीक असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांना यंदाचा ‘हृदयनाथ पुरस्कार’ घोषित झाला आहे. ज्येष्ठ गायक व संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ७७व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित आनंदसोहळ्यात सुलोचना यांना या पुरस्काराने गौरविण्यात येईल.
विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात २६ ऑक्टोबर या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार असून यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हृदयेश आर्टस या संस्थेचा रौप्यमहोत्सव यावेळी साजरा करण्यात येणार आहे. ‘अक्षय गाणे, अभंग गाणे’ या शीर्षकाखाली हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली गीते स्वत: हृदयनाथ, राधा मंगेशकर आणि विभावरी आपटे सादर करणार आहेत. अभिनेत्री समीरा गुजर-जोशी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
रेखा चवरे लिखीत, परचुरे मंदिर प्रकाशनाच्या ‘हृदयगंधर्व’ या पुस्तकाचेही यावेळी प्रकाशन होणार आहे, अशी माहिती आयोजक अविनाश प्रभावळकर यांनी दिली.