‘बँग बँग’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन मेंदूला झालेली दुखापत आणि पत्नी सुझानबरोबरच्या घटस्फोटासारख्या समस्येने त्रस्त होता. असे असले तरी, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या जीवनात आलेल्या या समस्यांमधून उभारण्यासाठी याच चित्रपटाने मदत केल्याने, अभिनेता हृतिक रोशनसाठी हा अॅक्शन-रोमान्टिक चित्रपट नेहमीच खास राहणार आहे. मेंदूला झालेल्या दुखापतीवर हृतिकला शस्त्रक्रिया करणे भाग पडल्याने चित्रपटाच्या शुटिंगला उशीर झाला. सिध्दार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटातील एका स्टंटदरम्यान हृतिकच्या मेंदूला इजा झाली. या घटनेनंतर त्याच्या १३ वर्षांच्या वैवाहिक जीवनाचादेखील अंत झाला. करण जोहरच्या ‘शुध्दी’ चित्रपटातूनदेखील त्याला बाहेर पडावे लागले.
हृतिक म्हणतो, ‘बँग बँग’ चित्रपट हा माझ्यासाठी स्वप्नवत आहे. मी भावनात्मक आणि व्यक्तिगतरित्या जीवनात उभ्या ठाकलेल्या आव्हानांशी झगडत असल्याने चित्रपट पूर्ण होण्यास जास्त वेळ लागला. परंतु, मी या सर्वातून बाहेर आलो. मी स्वत:ला खूप मजबूत केले. यामुळेच मी ‘बँग बँग’ चित्रपटाला माझी सर्वात मोठी जीत मानतो.
या चित्रपटाचे शुटिंग खूप थकविणारे असल्याचे सांगत, चित्रपटाने आपल्याला व्यक्तिगत अडचणीतून बाहेर निघण्यास मदत केल्याचे हृतिक म्हणाला. पुढे तो म्हणाला, प्रत्येक समस्येचे निदान आयुष्यात पुढे जाण्यातच आहे. जर जीवनात थांबून तुम्ही ‘हे फक्त माझ्याबरोबरच का झाले…?’ असा विचार करत एकाच जागी खिळून राहिलात, तर तुम्ही स्वत: तुमच्या जीवनाला बरबाद करत आहात. जास्तीत जास्त हास्य पसरविल्याने तुम्हाला यातून मुक्तता मिळेल आणि संभावनांची दारे उघडतील. ‘फॉक्स स्टार स्टुडिओ’ निर्मित या चित्रपटात कतरिना कैफची देखील भूमिका असून, हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात झळकत आहे.