शाहरूखची फिल्मी पार्टी असो किंवा गौरी खानच्या नव्या प्रकल्पाचा शुभारंभ सगळ्यात हिरीरीने भाग घेणारा ह्रतिक गेल्या काही दिवसांपासून शाहरूखच्या बंगल्याकडे फिरकलेला नाही की त्याच्याबद्दल एवढा वाद सुरू असताना मैत्रीचा साधा आधारही दिला नाही. या दोघांमध्ये काहीतरी बिनसले आहे, हे सगळ्यांना दिसते आहे. पण, ह्रतिकला याबाबतीत छेडण्याचा विविध प्रकारे प्रयत्न करूनही त्याने आपले मौन सोडलेले नाही. उलट, शाहरूखच्या लेखावरून जो वाद निर्माण झाला आहे त्याबाबतीत ‘शाळा सोडल्यावर माणसाने लहान मुलांसारखी भांडणे आणि वादावादी करू नये. तुमचे वय वाढत जाते तसतसे तुम्हाला समजूतदारपणे वागलेच पाहिजे’, असा उलट सल्ला दिला आहे.
‘क्रिश ३’ च्या चित्रिकरणात व्यस्त असलेला ह्रतिक ‘रॅडो’ कंपनीच्या नवीन घडय़ाळाच्या लॉचिंगच्या निमित्ताने प्रसिध्दीमाध्यमांशी बोलता झाला. आपल्या चित्रपटाविषयी आणि अन्य कामांविषयी भरभरून बोलणाऱ्या ह्रतिकने एसआरकेचा नामोल्लेखही शिताफीने टाळला. वैयक्तिक आयुष्यात ह्रतिक नेहमी वादविवाद, अफेअर्स या सगळ्या गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहिला आहे. त्याबद्दल तो म्हणतो, ‘एकदा तुम्ही वादग्रस्त विधान केले की दुसरा कोणीतरी त्याच्यावर उलट प्रतिक्रिया देतो. मग तिसरा वाद घालायला सुरुवात करतो. हे इतके वाढत जाते की नेमका वाद कु ठून सुरू झाला आणि हे मिटवायचे असेल तर कोणाला समजावून सांगायचे हे काहीच लक्षात येत नाही. अशावेळी आपल्या प्रत्येक शब्दाचा उलट अर्थ काढला जातो. हे सगळेच मूर्खपणाचे असते. माझे स्वत:चे म्हणणे आहे की एकदा शाळा शिकून आपण बाहेर पडलो म्हणजेच आपण मोठे झालो. त्या क्षणापासून कोणालाही उत्तर देताना, कोणाशीही बोलताना आपण जबाबदारीनेच बोलले पाहिजे’. ह्रतिकने एवढे मोठे तत्त्वज्ञान सांगितले मात्र, त्याच्यात आणि शाहरूखच्या मैत्रीत ताणतणाव आहेत की नाही, याबद्दल मात्र त्याने चकार शब्द काढला नाही. त्याच्या या चुप्पीतून दोघांच्या मैत्रीत अंतर पडल्याचेच स्पष्ट दिसून येत आहे.