गेल्यावर्षी बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानने त्यांच्या घटस्फोटाची बातमी जाहिर करून सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. यावर्षी त्यांनी घटस्फोटाची याचिकाही दाखल केली. मात्र, डिझायनर म्हणून नावारुपास आलेल्या सुझानने हृतिककडून ४०० कोटी रुपये पोटगी म्हणून मागितल्याचे सूत्रांकडून समजते. पण हृतिकने ३८० कोटी रुपये देण्याचे मान्य केल्याचे सांगितले जात आहे.
१४ डिसेंबर २०१३ला या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय जाहीर केलेला. त्यानंतर या दोघांनी माध्यमांशी वेगवेगळा संवाद साधला होता. हृतिक म्हणालेला की, “लग्नाच्या १३ वर्षानंतर सुझानने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. माझे तिच्यावरचे प्रेम कधीच कमी होणार नाही. माझ्या आयुष्यातील तिचे स्थान तसेच कायम राहिल.” तर दुसरीकडे सुझान म्हणाली होती की, “आम्ही दोघही स्वतंत्र असून, एकमेकांचा आदर करतो. आम्ही दोन सुंदर मुलांचे पालक आहोत. त्यांचे संरक्षण करण्याची आणि काळजी घेण्याची जबाबदारी आमची आहे. याच्यात काहीच बदल होणार नाही.” हृतिक आणि सुझानचा घटस्फोट हा बॉलीवूडमधला सर्वात महागडा घटस्फोट ठरणार आहे. जर हृतिकने ४०० कोटी रुपये पोटगी दिली तर आजपर्यंत सर्वाधिक पोटगी देण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदविला जाईल.
ट्रॅफिक सिग्नलवरच्या प्रेमाची अखेर
सिग्नलच्या लाल-हिरव्या दिव्यांकडे कं टाळून पाहत बसलेला नायक. त्याचवेळी त्याच्या बाजूला एक आलिशान गाडी येऊन उभी राहते. गाडीच्या काचांमधून हलकेसे डोकावणारा चेहरा.. त्याला बघताक्षणीच गोड वाटतो. काही मिनिटांत त्याच्या नजरेसमोर असणाऱ्या तरुणीची प्रत्येक गोष्ट त्याला भुरळ पाडून जाते. पहिल्या प्रेमाची जाणीव होऊन भानावर येईपर्यंत गाडी निघून गेलेली असते. आणि पुन्हा ती मित्राच्या लग्नात भेटते.. हा प्रसंग ह्रतिकच्या ‘कहो ना प्यार है’  या पहिल्याच चित्रपटातला असला तरी त्याच्या आयुष्यात वास्तवातही तो तसाच घडलेला होता. सुझान आणि ह्रतिक एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते, असे म्हटले जाते. पण, त्यांच्या प्रेमाची कहाणी मात्र ट्रॅफिक सिग्नलपासून सुरू झाली होती. ‘कहो ना प्यार है’ हिट झाल्यावर बॉलिवूडमध्ये आपली कारकीर्द वेगाने सुरू करण्याआधीच ह्रतिकने सुझानला अगदी चित्रपटातल्या कथानकाप्रमाणे मागणी घातली. अगदी त्याच्या मनाप्रमाणे चर्चमध्ये विवाहही केला. तेव्हापासून गेले १७ वर्ष हे जोडपे बॉलिवूडमधील आदर्श प्रेमी जोडपे मानले गेले.