वर्षभर या ना त्या कामात मी बिझी असतो. पण, आमच्या घराच्या गणपतीचे दीड दिवस मात्र मी राखून ठेवतो. या दोन दिवशी मी अजिबातच काम करत नाही. संपूर्ण वेळ बाप्पा आणि बाप्पासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी देतो. या दिवसांमध्ये फोनही मी शक्यतो बंदच ठेवतो. नातेवाईक, आप्तेष्टांची भेट होते. घरातलं वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं. पूर्वी आम्ही गणपतीच्या प्रतिष्ठापनेसाठी गुरुजींना बोलवायचो. पण, नंतर असं लक्षात आलं की आजकाल गुरुजी मंडळी त्यांच्या कामात व्यग्र असतात. त्यामुळे त्यांची आणि आमची वेळ जमून येत नाही. जमून आलीच तरी प्रतिष्ठापनेची पूजा उरकली जाते. ही गोष्ट मला खटकते. गणपतीला आपण एवढय़ा श्रद्धेने, आदराने घरी आणणार आणि त्याची प्रतिष्ठापनाच जर व्यवस्थित होणार नसेल तर ते योग्य नाही असं मला वाटतं. त्यामुळे आता आम्ही घरातलेच एकत्र बसून प्रतिष्ठापनेची सगळी तयारी करतो. आमच्याकडे शाडूची मूर्तीच असते. मी आमच्या मूर्तिकाराला मूर्तीसाठी वापरायचे रंग हे नैसर्गिक असू दे, त्यात कोणतंही रसायन नको, असं सांगितलंय. सजावटीत घरातल्या सगळ्यांचाच मोठा सहभाग असतो. माझे आई-बाबा, बायको दीप्ती, तिचे आई-बाबा, आमच्या दोघांची भावंडं असं प्रत्येक जण या सजावटीत सहभागी होत असतो. प्रत्येकाच्या कल्पना, क्रिएटिव्हिटी सगळ्याचा समतोल राखून बाप्पासाठी आरास आणि सजावट केली जाते. खरं तर या दिवसांमध्ये खाण्याची मजा असते. पण, मी गोड खाणं खूप कमी केलंय. मात्र मोदक अशी गोष्ट आहे जी तुम्ही टाळूच शकत नाही. त्यामुळे जरा बेतानेच, पण मोदकांवर ताव मारतो.