‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘वास्तव’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘पोपट’ यांसारखे हिट चित्रपट देणा-या सतिश राजवाडे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवातही एकांकिकांमधूनच केली होती. मनोरंजन क्षेत्रात येण्यासाठी एकांकिका स्पर्धा ही अतिशय महत्त्वाची पायरी आहे, असं मत सुप्रसिध्द दिग्दर्शक सतिश राजवाडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केलं. ‘लोकसत्ता’तर्फे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, अहमदनगर, औरंगाबाद आणि नागपूर अशा आठ केंद्रांवर ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
या क्षेत्राचा अवाका लक्षात येण्यासाठी आणि येथे बस्तान मांडण्यासाठी करावी लागणारी मेहनत एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर लक्षात येते. त्यामुळे एकांकिका स्पर्धा किती महत्त्वाच्या आहेत आणि आपला त्याचा अनुभव सतिश राजवाडे यांनी सांगितला यावेळी सांगितला.  
“मनोरंजन क्षेत्रात येण्यासाठी आवश्यक असलेल्या टीम वर्कचा अनुभव एकांकिका स्पर्धांमधूनच मिळतो. तुम्ही पडद्यावर काम करा किंवा पडद्यामागे पण एकांकिकेमधून जे संस्कार होतात, शिक्षण मिळतं ते शेवटपर्यंत तो कलाकार जतन करतो. त्यामुळे एकांकिकेचे संस्कार घडणं हे खूप गरजेचे आहेत,” असंही सतिश म्हणाले.