पहिला टाइमपास जिथे संपतो तिथून पुढे तीच दोन लहान मुले घेऊन दोन महिन्यांनी त्यांच्यात काय होतं हे दाखवणं हा माझ्या दृष्टीने एक सोपा मार्ग होता चित्रपट पुढे नेण्याचा. पण, त्यात मजा नव्हती. आत्ता ज्या पद्धतीने कथा पुढे नेली आहे त्यात एक मोठं आव्हान होतं ते म्हणजे पुन्हा दोन नवे कलाकार, पंधरा वर्षांनंतर बदललेला काळ हे सगळं घेऊन के लं तर लोकांना नक्कीच त्यात एक वेगळी गंमत वाटेल. आणखी एक विचार त्यात असा होता की आपण कितीही मोठे झालो, यशस्वी झालो तरी मला माझी शाळा आठवते. शाळेच्या बाहेर असणारा लिमलेटच्या गोळया विकणारा, कै ऱ्यांमध्ये मसाला घालून देणारा तो माणूस आठवतो. मला सहज चॉकलेट-कॅडबरी मिळू शकणार असते. पण, मला त्या लिमलेटच्या गोळ्याच हव्या असतात. हे कुठनं येतं आपल्यात? कुठेतरी असं वाटतं की आपला जो भूतकाळ आहे तो बऱ्याच गोष्टी करून घेतो आपल्याकडून. निखिल आणि आम्ही हे विचारसूत्र धरून कथा पुढे नेण्याचा विचार करायला लागलो. तेव्हा मग छोटा दगडू ज्याने पंधरा वर्षांपूर्वी प्राजक्ताला वचन दिलेलं आहे की मी मोठा झाल्यावर वाजतागाजत वरात घेऊन येईन तुझ्या घरी.. तो दगडू या मोठय़ा दगडूकडून काय काय करून घेतो? दगडू आणि प्राजक्ता एकमेकांना अजिबात भेटलेले नाही आहेत. एकमेकांबद्दल त्यांना काही माहिती नाही आहे. कधी मित्रांमध्ये विषय निघाला असेल तरच त्यांची नावं समोर येत असतील. म्हणजे आजच्या गप्पांमध्ये इतक्या वर्षांनी माझ्या चौथीतल्या गर्लफ्रेंडचा विषय पहिल्यांदा निघाला तसंच त्यांचंही झालं असेल. मग हे दोघं एकमेकांसमोर कसे येतात? एकमेकांना कसं शोधून काढतात?, हा जो प्रवास आहे तो म्हणजे ‘टाइमपास २’.

‘मित्रा’ हा माझ्या आयुष्यातील नया है वह क्षण
गेल्या वर्षी एक शॉर्ट फिल्मच्या वर्कशॉपसाठी गेलो होतो. आयोजकांपैकी एक म्हणून गेलो होतो. पण, त्यावेळी शॉर्ट फिल्म्सबद्दल जे ऐकत होतो, प्राध्यापक समर नखाते शॉर्ट फिल्म्सच्या काही गोष्टी सांगत होते. त्यावेळी अरे या विषयात आपण एकदमच ‘नया है..’ असं वाटलं. या जॉनरमध्ये आपण एकदमच नवीन आहोत हे लक्षात आलं. तेव्हा हा प्रयत्न करून पहायला हवा असं वाटलं. त्या एका ‘नया है यह’ प्रसंगाने माझं आयुष्य बदलून गेलं. कारण, त्यानंतरच मी माझी शॉर्टफिल्म ‘मित्रा’ बनवली. ज्याला यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

आव्हान ‘टाइमपास २’चं..
आमच्यात विचार झाला होता भाग दोन करायचा आहे का? ‘एस्सेल व्हिजन’च्या नितीन केणींचं म्हणणं होतं की कथेत क्षमता आहे त्यामुळे सिक्वलची शक्यता तुम्ही खुली ठेवा. पण, तेव्हा ‘टु बी कन्टिन्यूड’ची ओळ अशाही अर्थाने होती की यापुढेही हे असं होत राहणार, एक मुलगा-एक मुलगी भेटणार, प्रेमात पडणार, तिचे rv16वडील येणार आणि ते तुटणार हे वर्षांनुवर्ष घडत राहणारी गोष्ट आहे. त्या अर्थाने ते असंच चालू राहणार असं एक ओळ आम्ही सोडून दिली होती. मात्र, टाइमपास प्रदर्शित झाला तेव्हा काही दिवसांनी आम्ही सिंगापूरला असताना एक मेसेज आला ‘टाइमपास २’चं शूटिंग सुरू झालं. आधी पनवेलमध्ये सुरू झालं मग ठाण्यात शूटिंग सुरू झालं असा मेसेज आला. आणि हळूहळू ते वाढतच गेलं. नंतर माझ्याकडे पटकथा यायला लागल्या, गाणी रचलेली यायला लागली. अजूनही येतायेत गाणी. आत्ता काल दोन गाणी आली. आमचं गाणं तुम्ही टाइमपास-२साठी वापरा असं सांगून ही गाणी अगदी संगीत देऊन, रेकॉर्डिग करून पाठवलेली असतात. एवढी इन्व्हेस्टमेंट करून लोक गाणी पाठवतात. अशी पाचशे गाणी आली असतील. जवळजवळ सहा हजारच्या वर पटकथा आल्या आहेत. तेवढीच गाणी लिहिलेली आहेत. या सगळ्यातून लोकांची उत्सुकता लक्षात येत होती. त्या दोघांचं काय झालं हे लोकांना पाहायचं होतं त्यामुळे सिक्वलचा निर्णय पक्का झाला. पण, वर्षभराच्या आत सिक्वल करणं म्हणजे अजूनही लोकांच्या मनावर ‘टाइमपास’चा प्रभाव असताना ‘टाइमपास-२’ करणं हे खूप मोठं आव्हान होतं.                                        
 – रवी जाधव

*प्रिया बापट – प्रियदर्शन जाधव या नव्या जोडीला यूटय़ूबवर दहा लाख हिट्स मिळाल्या.