भारताने ऑस्करसाठी अधिकृतपणे पाठवलेला ‘लायर्स डाइस’ हा चित्रपट स्पर्धेतून बाद झाला आहे. उत्कृष्ट परभाषिक चित्रपट गटात हा चित्रपट पाठवण्यात आला होता. आता नऊ चित्रपट ९७व्या ऑस्कर अकादमी पुरस्कारांच्या पुढच्या स्पर्धेत गेले आहेत.
 एकूण ८३ चित्रपटांचे नामांकन या गटात झाले होते. ‘लायर्स डाइस’ हे एक रस्त्यावरील नाटय़ असून एक आदिवासी महिला तिच्या हरवलेल्या पतीला शोधण्यासाठी प्रवास सुरू करते त्यावर आधारित असून तो गीता मोहनदास यांचा पहिला चित्रपट होता. त्यात गीतांजली थापा व नवाझुद्दीन सिद्दिकी यांच्या भूमिका होत्या. आता उरलेले पाच चित्रपट न्यूयॉर्क व लॉसएंजल्स येथे निमंत्रित समित्यांकडून बघितले जातील व या वेळी प्रथमच लंडन येथे ९ ते ११ जानेवारी दरम्यान या चित्रपटांवर मतदान होणार आहे. भारताने परराष्ट्र चित्रपट गटात कधीच ऑस्कर मिळवलेले नाही.
‘लगान’ हा आशुतोष गोवारीकर यांचा चित्रपट ७४ व्या ऑस्कर पुरस्कारात पहिल्या पाचात पोहोचणारा पहिला चित्रपट होता. ‘मदर इंडिया’ व ‘सलाम बॉम्बे’ हे दोन चित्रपटही त्यात पोहोचले होते. ८७वा ऑस्कर पुरस्कार समारंभ २२ फेब्रुवारीला होणार आहे. या गटात इस्टोनियाचा ‘टँगेराइन्स’ हा चित्रपट आघाडीवर असून तो माजी सोव्हियत देशातील नागरी युद्धावर आधारित आहे.
जॉर्जियाचा ‘कॉर्न आयलंड’ हा जॉर्ज ओवाशवली यांचा चित्रपट, स्वीडनचा रूबने ओस्टुलँड यांचा ‘फोर्स मेजेयुअर’, नेदरलँडसचा ‘अ‍ॅक्युज्ड’, मॉरिटानियाचा ‘टिंबक्टू’, रशियाचा ‘लेव्हियाथा’ (आंद्रे व्यागिनस्टेव) पोलंडचा ‘इटा’, व्हेनेझुएलाचा ‘द लिबरेटर’ तर अर्जेटिनाचा ‘वाइल्ड टेल्स’ हे चित्रपट शर्यतीत होते.