खेळांवर आधारित चित्रपट असतील किंवा अ‍ॅक्शनपट त्यांचे दिग्दर्शन करणे ही सोपी गोष्ट नाही. हॉकी, क्रिकेट आणि अगदी बॉिक्सगसारख्या खेळांवर आपल्याकडे चित्रपट तयार झाले आणि त्यांना सफ लताही मिळाली. त्यामागे या चित्रपटांमध्ये चित्रित केले गेलेले खेळाचे सामने असतील किंवा इतर तपशिलांचे चित्रण असेल ते वास्तव वाटतील इतक्या सहजतेने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे ही दिग्दर्शकासाठी कसोटी असते. गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या शिमित अमिनच्या ‘चक दे इंडिया’पासून आत्ताच्या ‘मेरी कोम’ चित्रपटापर्यंत आंतरराष्ट्रीय स्टंट आणि खेळ दिग्दर्शित करणाऱ्या रॉब मिलर यांची मदत घेण्यात आली होती. आता ‘अझर’ या चित्रपटासाठीही रॉब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.हॉलीवूडमध्ये ‘जॉन मिलर मस्ट डाय’, ‘लायसेन्स टु वेड’सारख्या चित्रपटांसाठी काम पाहिलेल्या रॉब मिलर यांना बॉलीवूडमध्ये सध्या खूप मागणी आहे. शिमित अमिनच्या ‘चक दे इंडिया’मधील हॉकीचे चित्रण पहिल्यांदा रॉबच्या दिग्दर्शनाखाली करण्यात आले होते. त्यानंतर, राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘भाग मिल्खा भाग’ आणि गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ओमंग कुमार दिग्दर्शित ‘मेरी कोम’ या चित्रपटातही खेळ आणि इतर स्टंट दृश्यांचे चित्रीकरण हे रॉब मिलर यांच्या दिग्दर्शनाखाली करण्यात आले होते. त्यामुळे क्रिकेटपटू अझरुद्दीन याच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘अझर’ या चित्रपटातील क्रिकेटच्या सामन्यांची दृश्ये चित्रित करताना ती रॉब मिलर यांच्या दिग्दर्शनात केली जावी, असा निर्णय निर्माते ‘बालाजी मोशन पिक्चर्स’ आणि ‘एमएसएम मोशन पिक्चर्स’ यांनी घेतला आहे.लंडनमध्ये अझरुद्दीनच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या क्रिकेट सामन्यांचे चित्रीकरण करण्यात येणार असून रॉब मिलर आणि त्यांची टीम, अझरुद्दीनची भूमिका साकारणाऱ्या इम्रान हाश्मीसह खुद्द अझरुद्दीनही तिथल्या चित्रीकरणात सहभागी झाला आहे. ‘अझर’च्या सेटवरचा आमचा अनुभव अत्यंत आनंदाचा आणि उत्साहित करणारा असा आहे.

आम्ही या चित्रपटातील काही अवघड क्रि केट सामन्यांच्या दृश्यावर काम करतो आहोत. अझरुद्दीनच्या खेळाचे तंत्र समजून घेऊन इम्रानला काम करायचे आहे आणि तो सध्या त्याच्या क्रि केटिंगवर खूप मेहनत घेतो आहे. त्यामुळे ही दृश्ये चित्रित करतानाचा अनुभवच वेगळा आहे’, असे रॉब मिलर यांनी म्हटले आहे. ‘अझर’मधील क्रिकेटची दृश्ये कशी चित्रित केली जात आहेत यावर लक्ष ठेवण्यासाठी अझरुद्दीनही या सेटवर मिलर आणि त्यांच्या टीमबरोबर तळ ठोकून बसला असल्याचे समजते.