अरब देश आणि इस्रायल यांच्यात चालू असलेल्या संघर्षांला दोघांमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीचा अभाव हे मुख्य कारण आहे. गेली अनेक दशके आम्ही आमची कवाडे परस्परांसाठी बंद केली आहेत. मात्र आता ही कवाडे हलकेच उघडत आहेत. त्यामुळे इस्रायल आणि अरब देशांतील वैरभाव नष्ट झाला नाही, तरी कमी होण्यास निश्चित मदत होईल, असे मत इस्रायलचा संगीतकार इदान राशेल याने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. इदान सध्या भारत भेटीवर आला असून सोमवार व मंगळवारी त्याने मुंबईत आपल्या संगीताचा कार्यक्रम सादर केले.
इदान राशेल याने हिब्रू भाषेत अनेक दर्जेदार गाणी केली आहेत. त्याने केलेल्या ‘इदान राशेल प्रोजेक्ट’ या प्रकल्पात ९५ गायक व वादकांचा ताफा सहभागी झाला होता. या गाण्याला ‘द साउंड ट्रॅक ऑफ इस्राएल’ हा सन्मानही मिळाला आहे. इदानला ज्युईश संगीताबरोबरच इथिओपियन लोकसंगीत आणि जॅझ संगीताचीही उत्तम जाणकारी आहे. इदानच्या मते संगीत म्हणजे लोकांच्या आयुष्याचा ‘साउंड ट्रॅक’ असतो.
भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये वितुष्ट असले, तरी या दोन्ही राष्ट्रांनी सांस्कृतिक देवाणघेवाण कधीच बंद केली नव्हती. मात्र इस्राएल व अरब राष्ट्रांची परिस्थिती वेगळी आहे. गेली अनेक वर्षे आम्ही राष्ट्रे वेगवेगळ्या कप्प्यांत बंद होतो. आता इंटरनेटच्या माध्यमातून हे दरवाजे उघडत आहेत. त्यामुळे इस्रायलच्या संस्कृतीविषयी पलिकडील राष्ट्रांना, तर त्यांच्याविषयी आम्हाला समजू शकते. यातून वैरभाव कमी व्हायला मदत होईल, असे इदानचे म्हणणे आहे.
३५ वर्षीय इदानला भारतीय संगीताबद्दलही माहिती आहे. पं. रविशंकर, उस्ताद झाकीर हुसेन या शास्त्रीय संगीतातील दिग्गजांचे महानपण त्याला माहीत आहे. ए. आर. रेहमान हा भारतीय संगीताचा परदेशातील चेहरा असल्याचेही त्याचे मत आहे. इस्रायल या राष्ट्राला एकच सांगीतिक किंवा सांस्कृतिक चेहरा नाही. इस्रायलचे संगीत किंवा संस्कृती दर १०-१५ वर्षांनी बदलते. हा देश स्थलांतरीत लोकांमुळे बनला आहे. त्यामुळे येथे भारतीय, मोरोक्कन, रशियन अशा वेगवेगळ्या संस्कृती एकत्र आहेत. आणि संगीत म्हणजे या संस्कृती एकत्र आणणारा घटक आहे, असे त्याने सांगितले.
मुंबई भेटीनंतर इदान दिल्ली आणि कोलकाता येथेही जाणार आहे. तेथे तो आपली कला सादर करणार असल्याचे इस्रायलच्या दुतावासाच्या उच्चायुक्त ऑर्ना सागीव्ह यांनी सांगितले.

भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक शत्रूराष्टांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण सतत चालू राहिली आहे. त्यामुळे दोघांमधील संवादही सुरू राहिला. इदान इस्रायल – अरब संघर्षांवर जो उतारा शोधू इच्छितो त्याची रुजवात भारत- पाकिस्तान यांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीत असावी. ‘मलिका ए गजल’ बेगम अख्तर यांच्या एका पाकिस्तानभेटीत बेगम अख्तर यांनी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांपुढे ‘हमरी अटरिया पे आओ सवरिया, देखादेखी बलमा हुई जाए’ हा सार्थ दादरा गायला होता. या घटनेची आठवण इदानच्या भूमिकेमुळे आपसूकच होते.