जावेद अख्तर यांचं नाव लहानपणी ‘जादू’ असं होतं. शायरीचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे आणि वडिलांनी लिहिलेल्या उर्दू शेरमधील एका वाक्यातून त्यांचं नाव निवडलं गेलं होतं, असं सांगतात. त्यांच्या नावात आता जादू हा शब्द नसला तरी त्यांच्या लेखणीने हिंदी चित्रपटसृष्टीवर आणि लोकांवर केलेली जादू आजही कायम आहे. गेली पाच दशकं ते गीतकार म्हणून काम करत आहेत. त्यांनी जुन्या दिग्दर्शकांसाठी जितकी प्रभावी गाणी लिहिली तितक्याच ताकदीने त्यांनी नव्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांनाही आपलं शब्दरूप दिलं आहे. १९९३ नंतर २१ वर्षांनी त्यांनी पुन्हा एकदा पटकथाकार म्हणून नव्याने सुरुवात केली आहे. यानिमित्ताने आणि त्यांच्या झी क्लासिक वाहिनीवरच्या ‘क्लासिक लीजंड्स’ या शोबद्दल मारलेल्या गप्पा..
‘झी क्लासिक’ वाहिनीवरचा त्यांचा क्लासिक लीजंड हा शो खूप लोकप्रिय झाला. मर्यादित भागांच्या या शोचे याआधीच दोन पर्व पार पडले आहेत. आता नव्याने हा शो रुजू होत असताना सूत्रसंचालकोची ही भूमिका त्यांना किती आवडते?, या विषयावर हा शो त्यांच्या खूप आवडीचा असल्याचे ते सांगतात. दोन काळांना जोडून घेणारा हा शो आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा वैभवकाळ ज्याला म्हणता येईल अशा काळातील दिग्गज नायक, नायिका, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार यांचा जीवनप्रवास उलगडून सांगणं आपल्याला खूप भावतं, असं जावेद अख्तर यांनी सांगितलं. त्या काळातील कलाकृतींची अभिजातता या पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक वाटत असल्याचंही त्यांनी या वेळी बोलताना सांगितलं.
गीतकार म्हणून त्यांनी गाण्यांच्या कॉपीराइट्सचा मुद्दा उचलून धरल्यानंतर त्यांच्यावर इंडस्ट्रीने अघोषित बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे इतके चांगले विषय समोर असूनही आपल्याला गाणी लिहिण्याची संधी दिली गेली नाही, याबद्दल ते पोटतिडकीने बोलत असले तरी त्यांना त्याबद्दल खंत वाटत नाही. हिंदी चित्रपट संगीताच्या दृष्टीने हा खडतर काळ आहे, असं त्यांना वाटतं. मात्र, चित्रपटसृष्टीत कधीच कुठली एक गोष्ट फार काळ टिकून राहिलेली नाही. त्यामुळे चित्रपट संगीताची आजची स्थितीही लवकरच बदलेल, अशी आशा जावेद अख्तर यांनी व्यक्त केली.
आजवर त्यांनी गाण्यांसाठी अनेक पुरस्कार जिंकलेत. मात्र, एक प्रभावशाली गीतकार म्हणून त्यांना स्वत:ला हिंदी चित्रपटांमधील कुठली गाणी आवडतात, असे विचारल्यावर साठ आणि सत्तरचे दशक हे चित्रपट संगीताच्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते असे ते सांगतात. या दशकांमधली चित्रपटांसाठी लिहिलेली गाणी, त्यांचे बोल, त्यांचं संगीत, त्यांचं दिग्दर्शन आणि ज्या कलाकारांवर ती चित्रित केली गेली ते कलाकार अशा अनेक गोष्टी अनमोल होत्या. त्यामुळे त्या काळातली गाणी ऐकणं, त्यांच्याबद्दल बोलणं आणि त्यांची कथा उलगडून दाखवणं आपल्याला खूप आवडतं असंही ते म्हणाले.
गीतकार म्हणून त्यांची कारकीर्द त्यांनी आजवर जपली असली तरी ‘पटकथाकार’ म्हणून एकेकाळी हरएक चित्रपटामागे असलेलं त्यांचं नाव गेल्या कित्येक वर्षांत पडद्यावर उमटलेलंच नाही. ‘सलीम-जावेद’ या जोडगोळीने पटकथेच्या जोरावर इतिहास निर्माण केला आणि एका वादानंतर हा इतिहास घडवणारे दोन्ही पटकथाकार बाजूला पडले ते आजतागायत. १९९३ साली जावेद अख्तर यांनी ‘रूप की रानी चोरों का राजा’  या चित्रपटासाठी स्वतंत्रपणे शेवटची पटकथा लिहिली होती. आज चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीला पन्नास र्वष पूर्ण झाली आहेत आणि पुन्हा एकदा त्यांनी पटकथेसाठी लेखणी हातात धरली आहे. लेखणी धरली नाही तर पटकथा लिहूनही पूर्ण केली आहे, असं ते उत्साहाने सांगतात. त्यांची दोन्ही मुलं अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर आणि दिग्दर्शक झोया अख्तर यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. मात्र, आता झोयाच्या आगामी चित्रपटासाठी त्यांनी पटकथा लिहिली आहे. तिच्यासाठी मी याआधीही लिखाण केलं आहे, आता तर पूर्ण पटकथा लिहून झाली आहे, अशी माहिती देत पुढच्या प्रक्रियेबद्दल उत्सुकता असल्याचे ते सांगतात. आपली दोन्ही मुलं चांगलं लिहितात, याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.
झोया, फरहान यांच्याबरोबरच आत्ताचे जे तरुण दिग्दर्शक आहेत ते फार वेगळ्या पद्धतीने विचार करतात, असं त्यांना वाटतं. आजचे दिग्दर्शक हे चित्रपटाचा सर्व बाजूंनी विचार करतात. पटकथेच्या पहिल्या लेखनापासून ते अंतिम पटकथेपर्यंतच्या प्रक्रियेतही त्यांचा सहभाग असतो ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यांच्या विचारांना आमच्यासारख्या जुन्याजाणत्यांच्या अनुभवाची साथ मिळाली तर नक्कीच चांगली कलाकृती निर्माण होईल, असा विश्वास जावेद अख्तर यांनी व्यक्त केला. चांगला आशय लिहिला गेला पाहिजे, मग तो गीतांच्या माध्यमातून असेल नाहीतर कथेच्या माध्यमातून, तुम्ही मांडलेला विचार लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचलाही पाहिजे, अशी त्यांची धारणा आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत काम करण्याची ऊर्मी आहे तोवर आपली लेखणी नवनवे विचार मांडत राहील, असे त्यांनी सांगितले.