जनेफर लॉरेन्स, केट अपटोन, सेलेना गोम्स, क्रिस्टन डंन्स्ट यांच्यासह शंभराहून अधिक प्रख्यात सेलिब्रिटींची नग्न छायाचित्रे इंटरनेटवर लीक झाली. सेलिब्रिटी हॅकिंगची अलिकडच्या काळातील ही सर्वांत मोठी घटना असल्याचे बोलले जाते. ही छायाचित्रे पहिल्यांदा ‘4chan’ नावाच्या इमेज शेअरिंग संकेतस्थळावर आढळून आली. ही घटना म्हणजे खासगी जीवनाचे उल्लंघन असून, संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे लॉरेन्सने म्हटले आहे. एकंदर १०१ सेलिब्रिटींची छायाचित्रे हॅक झाली असून, या छायाचित्रांबाबतच्या सत्यतेसंदर्भात अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही. अन्य ज्या सेलिब्रिटींची छायाचित्रे लीक झाली आहेत, त्यात उब्रे प्लाझा, किम कर्दाशिया, व्हॅनसा हुडजेन, रिहाना, लिआ मिशेल, हिलरी डफ, कॅट डिले आणि अमेरिकन फुटबॉलपटू होप सोलो इत्यादींचा समावेश आहे. अभिनेत्री व्हिक्टोरिआ जस्टिसने आपले छायाचित्र खोटे असल्याचा दावा केला आहे.
याआधी २०१२च्या अखेरीस अशाच प्रकारे अनेक सेलिब्रिटींची नग्न छायाचित्रे ऑनलाईन लीक करण्यात आली होती. स्कॅर्लेट जॉनेसन आणि मिला कुनिसची खासगी छायाचित्रे हॅक करून ऑनलाईन पोस्ट केल्याबद्दल एका हॅकरला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री जेनेफर लॉरेन्ससह अनेक सेलिब्रिटींची ऑनलाईन अकाऊंट हॅक करून नग्न छायाचित्रे ऑनलाईन पोस्ट करण्याच्या या प्रकरणी एफबीआयने चौकशी सुरू केल्याचे समजते. तसेच, आपली ऑनलाईन फोटो शेअरिंग सुविधा हॅक झाली आहे का, ते पडताळून पाहात असल्याचे ‘अॅपल’ कंपनीद्वारे सांगण्यात आले.