मतिमंदांच्या समस्येबद्दल आज समाजात बरीच जाणीवजागृती झालेली आहे. त्यामानाने गतिमंदांच्या समस्येबद्दल अजून तितकीशी जागृती दिसत नाही. याचं कारण असंही असू शकेल की, सीमारेषेवरील गतिमंदत्वाची समस्या असलेलं मूल ओळखायला आणि ते वास्तव स्वीकारायला पालकांनाही वेळ लागतो. rv16म्हणूनच बहुधा ही समस्या असलेली मुलं काहीशी अलक्षित राहतात. ‘कळत-नकळत’ या नाटकात ही समस्या असलेल्या सोनू या तरुणाच्या बाबतीत मात्र याउलट घडतं. त्याच्याकडे नको इतकं लक्ष दिल्यानं त्याला मानसिक अपंगत्व येतं आणि त्याच्याबरोबरच त्याच्या भावाचं आयुष्यही साकळून जातं. खरं तर गतिमंदत्वाची समस्या ही मतिमंदांच्या समस्येइतकी दुर्धर नक्कीच नाही. या समस्येवर योग्य वेळी उपाय केले गेले तर अशी मुलं बऱ्यापैकी सुकर आयुष्य जगू शकतात. फक्त सामान्य (नॉर्मल) मुलांएवढी त्यांची प्रगती अपेक्षिता येत नाही, एवढंच. असो.
अनिल काकडे लिखित, दिग्दर्शित आणि प्रकाशयोजित ‘कळत-नकळत’ या नाटकात गतिमंदत्वाची समस्या काहीशी मेलोड्रॅमॅटिक पद्धतीनं हाताळली गेली आहे. विश्वास आणि सोनू हे दोघं जुळे भाऊ. त्यात जन्मानं सोनू विश्वासपेक्षा मोठा. आई-वडिलांच्या पश्चात सोनूची जबाबदारी विश्वासवर येते आणि त्या ओझ्यानं त्याचं सबंध आयुष्यच दडपून जातं. सोनूशिवाय त्याला दुसरं विश्व उरत नाही. सोनूचं करता करता त्याला त्याचं आयुष्य जगणंही दुष्कर होतं. अशात सोनूच्या ट्रीटमेंटचा खर्च झेपावा म्हणून तो घरातील एक खोली भाडय़ानं द्यायचं ठरवतो. परंतु सोनूच्या समस्येमुळे भाडेकरू मिळणं मुश्कील होतं. परंतु वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीमुळे रसिका नावाची एक तरुणी जागेची चौकशी करायला येते आणि सोनूमुळेच ती जागा घ्यायचं ठरवते.  
रसिकाच्या येण्यानं सोनूचं करण्यात आणखी दोन हात विश्वासच्या मदतीला येतात. सोनू व रसिकाची तर गट्टीच जमते. विश्वासलाही आयुष्यात पहिल्यांदा सोनूव्यतिरिक्त विचार करायला थोडी उसंत मिळते. आपल्यालाही एखाद्या बरोबरीच्या व्यक्तीची भावनिक व मानसिक सोबतीची नितांत आवश्यकता आहे याची त्याला प्रथमच जाणीव होते. रसिकामध्ये तो कळत-नकळतपणे गुंतत जातो. तीही!
मात्र, एका भयंकर घटनेनं रसिकाचं आणि त्या घराचंही भावविश्व उद्ध्वस्त होतं. एका भावप्रक्षुब्धक्षणी सोनू न राहवून रसिकाला मिठी मारतो आणि रसिकाला त्याच्यातल्या सुप्त लैंगिक प्रेरणांची जाणीव होते आणि ती प्रचंड हादरते. या घरात याउप्पर सोनूसोबत एकटीनं राहण्याची तिला भीती वाटू लागते. ध्यानी-मनी-स्वप्नी तिला असुरक्षिततेची भावना घेरून येते. त्यातून ती विश्वासला सोनूची योग्य व्यवस्था लावण्यासंदर्भात विनवते. पण आपल्यापासून सोनूला अलग करण्याची विश्वासची बिलकूल तयारी नसते. तो उलट रसिकालाच थोडंसं समजुतीनं घेण्यास सांगतो. यातून आपण काहीतरी मार्ग काढू असं म्हणतो. परंतु नुसत्या आश्वासनावर विसंबून त्या घरात राहणं रसिकाला मात्र अशक्य होतं. ती घर सोडण्याचं ठरवते.
..त्याचवेळी सोनू घरातून गायब होतो. तो कुठं गेला, कसा गेला, काहीच कळत नाही. पोलिसांत फिर्याद नोंदवूनही त्याचा थांगपत्ता लागत नाही. रसिकामुळे आपण सोनूला गमावलं, या पिळवटणाऱ्या जाणिवेनं विश्वास पार कोलमडून जातो. रसिकालाही हे आपल्यामुळेच घडलं याची तीव्र बोच लागून राहते. परंतु या साऱ्याला विश्वासची निर्णय-अक्षमताही तितकीच कारणीभूत आहे, याचं भान ती त्याला आणून देऊ पाहते. तिचं म्हणणं विश्वासला पटतंही; परंतु आंधळ्या बंधूप्रेमापोटी त्याचं वास्तवाचं भान हरपलेलं असतं. आता झाल्या गोष्टीबद्दल पश्चात्ताप करून काहीच उपयोग नसतो. सोनू तर घर सोडून गेलेला असतो. आजवर सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असलेला सोनू आता कुठं असेल, कसा जगत असेल, काय करत असेल, या विचारांनी विश्वासची तहान-भूक, जाणीव-नेणीव हरपून जाते. आणि त्याला या दु:खातून कसं सावरायचं, या काळजीनं रसिकाही हतबल होते.
अशात..
‘कळत-नकळत’मध्ये लेखक-दिग्दर्शक अनिल काकडे यांनी एक चांगला मेलोड्रामा रचला आहे. त्यातल्या घटना अनपेक्षित नसल्या तरीही प्रयोगाच्या हाताळणीमुळे खिळवून ठेवतात. एकीकडे वास्तव चित्रणाचा आभास निर्माण करत काकडे यांनी प्रेक्षकानुनयी नाटकाचा फॉम्र्युला यात यशस्वीपणे राबवला आहे. तथापि ज्या कारणासाठी विश्वास आपल्या घरातील खोली भाडय़ाने देतो, ती सोनूची ट्रीटमेंट मात्र नाटकात कधीही होताना दिसत नाही. प्रत्यक्ष ट्रीटमेंट नाही तर नाही, परंतु सोनूमध्ये त्यामुळे होणारे बदल जरी सूक्ष्मपणे नाटकात पेरले असते तरी पुढे घटणाऱ्या घटनांना काहीएक ठोस आधार मिळता. विश्वास एके ठिकाणी रसिकाला म्हणतो की, ‘मी त्याच्यावर उपचार केलेच नाहीत असं तुला वाटतं का?’ तसं जर असेल तर सोनूच्या शिक्षणासाठी, त्याच्या विकासासाठी त्यानं नेमकं काय केलं, हे तरी कुठंतरी यायला हवं होतं. सोनूच्या बाबतीत गतिमंदत्वाची समस्या तीव्रतम असल्यानं त्याच्यात फार सुधारणा झाली नसावी, असा संदिग्धतेचा फायदा आपण विश्वासला एक वेळ देऊ शकतो. पण लेखकानं तसंही कुठं नमूद केलेलं नाही. असो. सोनूचं शारीरिक वय साधारण पंचविशीच्या पल्याड असावं. कारण ‘त्याचं लग्न झालं असतं तर त्याला आज मुलं असती,’ असं विधान विश्वासच्या तोंडी आहे. याचा अर्थ त्याची बौद्धिक प्रगती अगदीच मंद असावी असा काढायचा तर दुसरीकडे त्याच्या चित्रांतून त्याला बऱ्यापैकी बौद्धिक समज असल्याचं जाणवतं. शिवाय एका बाहुलीला तो, ती आपली बायको असल्याचंही मानतो. याचा अर्थ त्याला आपल्या वयाचीही जाणीव असावी. असं असताना त्याच्या हालचाली, वागणं-बोलणं मतिमंद मुलांप्रमाणे दाखवणं कितपत योग्य आहे? विश्वासनं घराबाहेर जाताना सोनूच्या पायात साखळी बांधलेली दाखवणंही कितपत उचित आहे? परिस्थितीवश का असेना, मानवी क्रौर्याचंच हे निदर्शक आहे. गतिमंद आणि मतिमंद यांच्यात फरक असतो याची जाणीव लेखकाला निश्चितच असायला हवी. अशा अनेक त्रुटी वा दोष संहितेत आणि प्रयोग हाताळणीतही जाणवतात. असं असूनही कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे नाटक प्रेक्षकांना बांधून ठेवतं. सोनूबद्दलच्या सहानुभूतीचाही त्यात वाटा आहे. विश्वासच्या रूपानं आजकाल दुर्मीळ झालेल्या कर्तव्याच्या जाणिवेचं आणि भावनिक बांधीलकीचं दर्शन यात घडतं. त्यामुळेही प्रेक्षकांना नाटक भावतं. पहिला अंक वास्तवाच्या अंगानं जात असला तरी दुसऱ्या अंकात मात्र मेलोड्रामाची मात्रा अंमळ जास्त झालेली आहे.
प्रदीप पाटील यांनी विश्वासचं घर नाटकाच्या मागणीनुसार उभं केलं आहे. त्यांनी सोनूच्या खोलीत ठेवलेल्या बाहुल्या या त्याच्या बौद्धिक वयाच्या निदर्शक मानाव्यात का? – प्रश्न आहे. नाटकाच्या दृश्यपरिणामात अमीर हडकर (संगीत), तमन्ना नायर (नृत्ये), बी. विनायक आणि मंदार चोळकर (गीते) आणि अनिल काकडे (प्रकाशयोजना) यांनी आपापली कामगिरी चोख वठवली आहे. पात्रांना अस्सलता प्रदान करण्यात वंदना शिंदे (वेशभूषा) आणि जगदीश शेळके (रंगभूषा) यांनीही मोलाची भूमिका पार पाडली आहे.  
सोनूच्या भूमिकेत सूर्यकांत गोवळे यांनी कमाल केली आहे. तीव्रतर गतिमंद तरुणाची लक्षणं त्यांनी सर्वार्थानं दाखविली आहेत. इतकी, की हा मतिमंद तर नाही, असंही काही वेळा वाटतं. हालचाली, वागणं-बोलणं, अभिव्यक्ती.. साऱ्यांत हे जाणवतं. गतिमंद भावाचं लालनपालन करता करता स्वत:चं अस्तित्व, स्वत:चं आयुष्यही विसरून गेलेला विश्वास- संजय खापरे यांनी अप्रतिम रंगवला आहे. त्यात कुठंही दाखवेगिरी नाही. आहे ते भावाबद्दलचं निखळ प्रेम आणि आतडय़ाचं नातं. म्हणूनच सोनू बेपत्ता झाल्यावरचं विश्वासचं कोलमडणं खरं वाटतं. या भूमिकेला संहितेपल्याड जात संजय खापरे यांनी बरंच काही दिलं आहे. त्यांच्या किंचित वाकलेपणातून त्यांच्यावरचं जबाबदारीचं ओझं प्रतीत होतं. मीनल बाळ यांची रसिकाही लाघवी आहे. गतिमंद सोनूला समजून घेत त्याच्याशी नातं जुळवत असतानाच दुसरीकडे विश्वासचं आयुष्यही ती सावरते. या सगळ्या धडपडीत तिचं स्वत:चं गोठून गेलेलं आयुष्यही खळाळून वाहू लागतं.. हे सारं त्यांनी उत्कटतेनं दाखवलं आहे. एका क्षणी रसिका व्हिलन ठरण्याची शक्यता असतानाही ज्या समझदारीनं ती विश्वासची चूक त्याच्या पदरी घालते, आणि नंतर त्याला हळुवारपणे सावरतेसुद्धा- तो नाटकाचा (आणि रसिका-विश्वासच्या आयुष्यातीलही!) टर्निग पॉइंट ठरतो. सुरेश सरदेसाई स्वल्प भूमिकेत लक्ष वेधून घेतात.
आदर्श मानवी मूल्यांचं समर्थन करणारं हे नाटक आजच्या व्यक्तिवादी युगात निश्चितच महत्त्वाचं ठरावं.