एकांकिका स्पर्धेत आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या ‘अस्तित्व’ आयोजित ‘कल्पना एक अविष्कार अनेक’ स्पर्धेत ‘ब्लॅकआऊट’ ही एकांकिका प्रथम तर ‘खेळ मांडियेला’ ही एकांकिका द्वितीय क्रमांकाने विजयी ठरली. स्पर्धेचे यंदा २८ वे वर्ष होते.   
शिवाजी मंदिर, दादर येथे झालेल्या अंतिम फेरीत पुणे, मुंबई, कल्याण आणि नागपूर विभागातील एकांकिका सादर झाल्या. अंतिम फेरीसाठी राजन भिसे, विद्याधर पाठारे आणि अरुण नलावडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार राजन खान यांनी सुचविलेल्या ‘माणसं’ या विषयावर पाच एकांकिका अंतिम फेरीत सादर झाल्या.
‘ब्लॅकआऊट’ एकांकिकेसाठी संदेश जाधव सवरेत्कृष्ट दिग्दर्शक तर ‘खेळ मांडियेला’ या एकांकिकेसाठी विशाल कदम सवरेत्कृष्ट लेखक ठरले.
अंतिम फेरीतील अन्य पारितोषिके अशी : सवरेत्कृष्ट संगीतकार-अभिजित पेंढारकर (सर्पसत्र), सवरेत्कृष्ट नेपथ्यकार-वैभव नवसकर (उडान), सवरेत्कृष्ट प्रकाशयोजनाकार-श्याम चव्हाण (ब्लॅकआऊट), सवरेत्कृष्ट अभिनय-ओमकार भोजना (खेळ मांडियेला).
पुढील वर्षांपासून ही स्पर्धा हिंदी भाषेसाठीही घेण्यात येणार असल्याची घोषणा ‘अस्तित्व’चे रवी मिश्रा यांनी या वेळी केली. सूत्रसंचालन किर्तीकुमार नाईक यांनी केले.