बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ ह्या टिव्हीवरील प्रसिध्द प्रश्नमंजुषेच्या कार्यक्रमाचे आठवे पर्व धुमधडाक्यात सुरू होण्याच्या तयारीत आहे. प्रसिध्द विनोदवीर कपिल शर्मा सेलिब्रेटी स्पर्धक म्हणून या शोच्या उद्घाटन भागात पाहायला मिळणार असून, सध्या याचे चित्रीकरण सुरतमध्ये सुरू आहे. ७१ वर्षीय अभिनेते अमिताभ बच्चन यांनी याच्याशी निगडीत एक छायाचित्र आपल्या ब्लॉगवर शेअर केले आहे. सुरतमधील शोसाठीचा सराव कपिल शर्मासारख्या श्रेष्ठ व्यक्तिंबरोबर करण्यात आल्याचे त्यांनी या छायाचित्राबरोबरच्या संदेशात नमूद केले आहे. गुजराथचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असलेले अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या त्यांच्या प्रसिध्द रिअॅलिटी गेम शोच्या उद्घाटन भागाच्या चित्रीकरणासाठी सज्ज झाले आहेत. सामान्य ज्ञानावर आधारित या शोचे पहिल्यांदाच सुरतमध्ये स्थानिकांच्या साक्षिने लाईव्ह चित्रीकरण होणार आहे. त्यानंतर सोनी वाहिनीवर याचे प्रसारण करण्यात येईल. प्रसारणाची तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही. २ ऑगस्ट रोजी ‘सुरत इंटरनॅशनल एक्झिबिशन अॅण्ड कन्व्हेंशन सेंटर’मध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.