विश्व हिंदू परिषदेतर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘हिमालय ध्वनी’ या मासिकाच्या ‘लव्ह जिहाद’ विषयावरील ताज्या अंकाच्या मुखपृष्ठावर अभिनेत्री करीना कपूरचा बुरख्याने अर्धा झाकलेला चेहरा वापरण्यात आल्यामुळे या विषयावरील वाद नव्याने उफाळण्याची चिन्हे आहेत.
अभिनेता सैफ अली खानशी विवाह केलेल्या करीना कपूरच्या छायाचित्राचा अशा रीतीने उपयोग केल्यामुळे सध्याच्या धर्मातर आणि ‘घर वापसी’च्या वादात भर पडली आहे. काँग्रेस पक्षासह अनेकांनी या मासिकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
विहिंपने मात्र आपल्या हिमाचल प्रदेश शाखेतर्फे  काढले जाणारे हे मासिक अंतर्गत वितरणासाठी असून, हिमाचल प्रदेशातील धर्मातरासह लव्ह जिहादच्या मुद्दय़ावर प्रकाश टाकण्याचा त्यात प्रयत्न करण्यात आल्याचे म्हटले आहे.