‘कौन बनेगा करोडपती’च्या ‘हॉटसीट’वर पोहचण्याची आकांक्षा कित्येकांच्या मनात असते. कार्यक्रमाची प्रवेशप्रक्रि या सुरू झाली की लोक पटापट एसएमएस पाठवण्यास सुरुवात करतात. आपली कधीतरी निवड होईल, अशी आशा लोकांना असते. यंदा मात्र ही ‘हॉटसीट’ तुमच्या आमच्या शहरात येऊन पोहचणार आहे. देश भरातील १०० निवडक शहरांमध्ये ‘केबीसी’चा खेळ रंगणार असून त्यातील विजेता थेट अमिताभ बच्चन यांच्यासमोर ‘हॉटसीट’वर जाऊन बसणार आहे.
केबीसीच्या पुढील पर्वासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत केबीसी केवळ मुंबई, दिल्लीसारख्या शहरांपुरताच मर्यादित असल्याचा समज होता. हा गैरसमज पुसून देशभरात पोहोचण्याचा आमचा मानस आहे. यंदाच्या पर्वातून हा खेळ केवळ पैशांचा नसून येथे मनेही जोडली जातात, हे लोकांना सांगायचे आहे, असे ‘सोनी’चे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष आणि बिझनेस हेड नचिकेत पंतवैद्य यांनी सांगितले.
‘केबीसी’ची निवडप्रक्रिया याआधीच पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच या शहरांची यादी ‘सोनी’कडून घोषित केली जाईल. त्याचबरोबर भारतातील चार शहरांमध्ये ‘केबीसी’चे प्रचारात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सुरत आणि मुंबई यांची नावे नक्की झाली असून दोन शहरांची नावे जाहीर व्हायची आहेत. या कार्यक्रमांमध्ये खुद्द अमिताभ बच्चन सहभागी होणार आहेत.
यंदाच्या पर्वाची टॅगलाइन ‘यहाँ पे पैसेही नहीं, दिल भी जिते जाते हैं’ असून त्याला अनुसरून हा खेळ केवळ ‘हॉटसीट’वर बसलेल्या स्पर्धकापर्यंत मर्यादित न ठेवता त्याला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यंदा ‘कम्युनिटी हेल्पलाईन’ या एका नवीन हेल्पलाईनचा समावेश कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यानुसार आता स्पर्धकाला त्याच्या अडचणीच्या वेळी त्याच्या एका मित्राची किंवा नातेवाईकाची नाही तर, मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या एका संपूर्ण गटाची मदत घेता येणार आहे.
तसेच मागील काळात ज्या स्पर्धकांच्या आयुष्याला ‘केबीसी’मुळे कलाटणी मिळाली अशा स्पर्धकांचा शोधही यानिमित्ताने घेण्यात येणार असून त्यांनाही कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे.