कर्करोगावरील उपचार आणि थॅलेसेमियाबाबत जागृतीसाठी निधी संकलनाचा एक भाग म्हणून प्रतिभावान गझल गायकांचा कलाविष्कार असलेला ‘खज़ाना’ हा गझल महोत्सव १ व २ ऑगस्ट रोजी द ओबेरॉय हॉटेलमध्ये होणार आहे. सलग तेरावे वर्ष साजरा करणारा यंदाचा कार्यक्रम भारतीय चित्रपटांमधील १०० वर्षांतील गझलांना समर्पित केला जाणार आहे.
भूपिंदरसिंग व मिताली सिंग, तलत अझीझ, सोनू निगम, सुरेश वाडकर, साधना सरगम, रुना व नेहा रिझवी, श्रुती पाठक, तौसिफ अख्म्तर, सुरिंदर खान, पूजा गायतोंडे आणि पंकज उदास हे कलाकार या कार्यक्रमात गझला सादर करतील. कॅन्सर पेशंट्स एड सोसायटी (सीपीएए), पॅरेंट्स असोसिएशन ऑफ थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट (पीएटीयूटी) आणि द ओबेरॉय, मुंबई या संस्थांनी एकत्रितपणे आयोजित केलेल्या या गझल महोत्सवातून उभारला जाणार निधी कर्करोग व थॅलेसेमियाचे रुग्ण यांच्यावरील उपचार व त्यांचे पुनर्वसन यांसाठी वापरला जाईल. गेल्या वर्षी झालेल्या ‘खज़ाना’ तून ४५ लाख रुपये उभारले गेले होते.
अनुप जलोटा आणि तलत अझीझ यांच्यासोबत एकदा झालेल्या चर्चेतून ‘खज़ाना’ ची संकल्पना जन्माला आली. गझल गाण्याबाबत आमची आवड आणि त्यातून समाजाला मदत हे दोन्ही उद्देश यातून साध्य होतात. यंदाचा कार्यक्रम भारतीय चित्रपटांमधील १०० वर्षांतील गझला आणि नज्म्म यांना समर्पित केला असून, तौसीफ अझीझ यांच्या संगीत निर्देशनात काही आघाडीचे कलाकार त्या सादर करणार आहेत, असे पंकज उदास यांनी सांगितले.
या महोत्सवाच्या दैनंदिन देणगी प्रवेशिकांची किंमत ५ हजार रुपये असून, त्या २३ जुलैपासून काळाघोडा येथील ऱ्हिदम हाऊसमध्ये उपलब्ध असतील. संपर्क ४३२२२७०१