भारतातील क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे आयपीएल सारख्या क्रिकेटच्या हंगामात चित्रपटगृहांत शुकशुकाट असल्याचे साधारण चित्र पहायला मिळते. आयपीएलसारख्या क्रिकेट हंगामात भारतीय प्रेक्षक शक्यतो घरात बसून किंवा मैदानावर जाऊन क्रिकेटचा आनंद लुटणे पसंत करतात. त्यामुळे या काळात बॉलीवूड निर्मात्यांकडून शक्यतो चित्रपट प्रदर्शित करणे टाळले जाते. मात्र गेल्या काही वर्षांतील ट्रेंड बघता आयपीएलच्या हंगामात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आयपीएलच्या सुरूवातीच्या हंगामात बॉलीवूडचे आठ चित्रपट प्रदर्शित झाले होते, तर आयपीएलच्या पाचव्या आणि सहाव्या मौसमापर्यंत बॉलीवूडने दहा चित्रपटांच्या प्रदर्शनाचा आकडा गाठला होता. मात्र, यंदाच्या हंगामात बॉलीवूडमधील लहान-मोठ्या बॅनरचे तब्बल २० चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत याचा बहुचर्चित ‘कौचादैयान’ हा चित्रपट येत्या ९मे रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचप्रमाणे  सुभाष घई यांचा ‘कांची – द अनब्रेकेबल’, कंगनाचा ‘रिव्हॉल्वर रानी’ तसेच ‘सम्राट अॅण्ड कंपनी’, ‘हवा-हवाई’, ‘हिरोपंती’ हे चित्रपटसुद्धा आगामी काळात प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे बॉलीवूड आणि क्रिकेट हातात हात घालून एकत्र आल्याचे बदलते चित्र पहायला मिळत आहे. मात्र, यासाठी चित्रपटांची वाढलेली संख्या आणि स्पर्धा कारणीभूत असल्याचे ओरमॅक्स मिडीयाचे सीईओ शैलेश कपूर यांनी सांगितले आहे. सध्याच्या दिवसांत अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी चांगल्या तारखेच्या प्रतिक्षेत असतात. परंतु, चित्रपटांची वाढलेली संख्या आणि वर्षभरातील फक्त ५२ आठवड्यांचा कालावधीचा विचार करता आपला चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित करण्याशिवाय निर्मात्यांकडे पर्याय नसल्याचे शैलेश कपूर यांनी सांगितले.