टेलिव्हिजनवरील ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या गाजलेल्या मालिकेतील ‘बा’ ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुधा शिवपुरी यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी आहेत. त्यांनी टेलिव्हिजवरील ‘रजनी’, ‘रिश्ते’, ‘सरहदे’ आणि ‘बंधन’ या मालिकांमध्ये काम केले होते. याशिवाय, ‘स्वामी’, ‘इन्साफ का तराजू’, ‘हमारी बहू अल्का’, ‘द बर्निंग ट्रेन’ आणि ‘माया मेमसाब’ या हिंदी चित्रपटांमधूनही अभिनय केला होता. राजस्थानमध्ये जन्मलेल्या सुधा यांचे १९६८ साली ओम शिवपुरी यांच्याशी लग्न झाले, त्यानंतर त्यांनी दिल्लीत थिएटरमध्ये काम करण्यास सुरूवात केली. दोघांनी मिळून ‘दिशांतर’ नावाची कंपनी स्थापन केली, ज्याअंतर्गत अनेक नाटकांचे दिग्दर्शनही करण्यात आले. त्यात ‘आधे अधुरे’, ‘तुघलक’ अशा नाटकांचा समावेश होता. २०१३ सालापासून सुधा शिवपुरी यांना तब्येतीचा त्रास जाणवत होता. डिसेंबर २०१३मध्ये त्यांना हदयविकाराचा झटकादेखील येऊन गेला होता. त्यानंतर त्या तब्बल सहा महिने रुग्णालयात होत्या.
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’  या मालिकेतील ‘तुलसी’च्या भूमिकेमुळे घराघरांत पोचलेल्या अभिनेत्री आणि मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी सुधा शिवपुरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. मी जरी ‘बा’सोबत काही वर्षेच घालवू शकले तरी त्या माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या. त्यांनी मला जे संस्कार, मूल्य दिली ते शेवटपर्यंत माझ्यासोबत राहतील. माझ्या खासगी व राजकीय जीवनातही त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले, असे स्मृती यांनी सांगितले.