ऐन आषाढात पंढरपूरच्या विठूमाऊलीला साक्षी ठेवून ‘माऊली’ नावाच्या तरूणाची कथा सांगणाऱ्या ‘लय भारी’ चित्रपटाने शुक्रवारी प्रदर्शित झाल्या झाल्या तब्बल ३. १० कोटींची विक्रमी कमाई केली आहे. ‘टाईमपास’ आणि ‘दुनियादारी’ या चित्रपटांचे विक्रम मोडीत काढत पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ३.१० कोटींची कमाई करत नवा विक्रम केला आहे. ‘एक व्हिलन’ चित्रपटातली रितेशची अप्रतिम कामगिरी, त्याला मिळालेले यश आणि पाठोपाठ आलेला मराठीतला रांगडा माऊली यामुळे हा चित्रपट सगळीकडे हाऊसफुल्ल गर्दीत सुरू असल्याचे ट्रेड विश्लेषक तरण आदर्श आणि कोमल नहाटा यांनी म्हटले आहे.
‘लय भारी’ चित्रपटाला मिळालेल्या या प्रचंड यशाबद्दल खूप आनंद झाला असल्याचे रितेश देशमुखने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. लोकांनी घराबाहेर पडून हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे आजच्या दिवसाचा विक्रम हा लोकांनी केलेला आहे, असे मत त्याने व्यक्त केले. सिनेमंत्र, मुंबई फिल्म कंपनी निर्मित आणि एस्सेल व्हिजनची प्रस्तुती असलेला ‘लय भारी’ हा चित्रपट पहिल्यांदाच महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांमधून दाखवण्यात आला. मराठीत पहिल्यांदाच या चित्रपटाचे दिवसाला १५०० शो दाखवण्यात येणार होते. मात्र, प्रत्यक्षात बऱ्याच ठिकाणी प्रेक्षकांच्या मागणीमुळे शोची संख्या वाढवा४ी लागली, अशी माहिती एस्सेल व्हिजनचे बिझनेस हेड निखिल साने यांनी दिली. शुक्रवारी मुंबईत पाऊस असतानाही मल्टिप्लेक्समध्ये हाऊसफुल्लची पाटी लागली होती. किंबहुना, पावसामुळेच कल्याण-डोंबिवलीत ‘लय भारी’चे शो वाढवावे लागले, असेही त्यांनी सांगितले.