प्रदीर्घ कालावधीनंतर लतादीदींनी गायलेल्या गाण्यांचा एक अल्बम रसिकांच्या भेटीस येत आहे. या अल्बममधील सुफी रचनांना लता दीदींचा स्वर लाभला आहे. ‘हाय रब्बा’ असे या अल्बमचे नाव असून त्याची निर्मिती एल.एम. म्युझिक कंपनी आणि सारेगामा यांनी संयुक्तपणे केली आहे. दस्तुरखुद्द लता दीदींनीच रविवारी याविषयी माहिती दिली.
गेली ७२ वर्षे मी गाते आहे. अनेकविध भाषांमध्ये मी अनेक प्रकारची गाणी गायली आहेत. पण सुफी संगीतावर आधारित दोनच गाणी मी आजवर गायली आहेत. ‘हाय रब्बा’मध्ये सुफी संगीतातील गाणी असून त्यातील काही गाणी मी तर काही गाणी माझा भाचा वैजनाथ मंगेशकर याने गायली आहेत, अशी माहिती लतादीदींनी दिली.
वैजनाथ गेले वर्षभर या अल्बमवर काम करतो आहे. ही गाणी कोणाकडून गाऊन घ्यायची याचा विचार करतोय, असे वैजनाथ मला म्हणाला. त्यावर मी त्याला विचारलं, ‘तुला कोण हवय?’ तेव्हा लगेच त्याने ‘तू म्हणशील का?’ असे विचारले. सुफी संगीतावर आधारित गाणी गाण्याची माझी इच्छा होतीच. त्यामुळे मी त्याला लगेच होकार दिला. या गाण्यांचे संगीत वैजनाथचेच आहे, अशी माहितीही लता दीदींनी दिली.
२४ एप्रिल रोजी मुंबईत षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार सोहळ्यात या अल्बमचे प्रकाशन होणार आहे. याचे प्रकाशन उस्ताद झाकिर हुसेन यांच्या हस्ते व्हावे, अशी विनंती आम्ही त्यांना करणार असल्याचेही लतादीदींनी सांगितले.