ऐंशिच्या दशकात दक्षिण भारतातील तमिळ अथवा मल्याळम चित्रपटाच्या दिग्दर्शनातून हिंदी चित्रपटसृष्टीत आलेल्यापैकी बापू यांचे ३१ ऑगस्ट रोजी चेन्नई येथे निधन झाले. निधनाच्यावेळी त्यांचे वय एंशी वर्षे इतके होते. हिंदीत त्यांनी वो सात दिन, हम पाँच, मेरा धरम, बेजुमान, मोहब्बते, धर्म और कानून इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘वो सात दिन’ या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूरची होती आणि त्याच चित्रपटाद्वारे अनिल कपूर नायक म्हणून नावारुपाला आला. त्यात नासिरुद्दीन शाह आणि पदमिनी कोल्हापुरे यांच्याही भूमिका होत्या. तर समांतर चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारणाऱ्या अमरीश पुरी यांना बापूनीच ‘हम पाँच’ या चित्रपटात जोरदार खलनायकाची भूमिका देवून नावारुपाला आणले. बापू यानी दक्षिणेतील आपले काही चित्रपट पुन्हा हिंदीतही दिग्दर्शित केले. वाम्सा वृक्षम, श्री रामराज्यम हे त्यांचे दक्षिणेकडचे उल्लेखनीय चित्रपट होत. भारतीय संस्कृतीच्या विषयाची सोपी मांडणी आणि त्यात मनोरंजनाचा मसाला हे त्यांचे कौशल्य होते.