गेली पंधरा वर्ष मुंबई शहराची सांस्कृतिक ओळख म्हणून नावाजलेला ‘मामि’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव निधीअभावी होणार नाही, अशा निर्णयाप्रत आयोजक आल्यानंतर बॉलिवूडची नामी मंडळी सतर्क झाली. निर्माता आनंद महिंद्रा, मनिष मुंद्रा, रोहित खत्तार, विधू विनोद चोप्रा ते अभिनेता आमीर खान अशा अनेकांनी निधी एकत्र करत यंदाच्या ‘मामि’ महोत्सवाची मोट बांधली आहे. एका तपानंतर महोत्सवाची पूर्ण सूत्रे नव्या पिढीतील चित्रपटकर्मींनी हातात घेतली असून त्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या ‘मामि’मध्ये अभिनेत्री हेलन यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली.
१४ ते २१ ऑक्टोबर दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून अंधेरीतील पीव्हीआर सिनेमा हे महोत्सवाचे मुख्य स्थळ असणार आहे.
उपग्रह प्रक्षेपणाच्या मदतीने महोत्सवातील चित्रपट दक्षिण मुंबईतील लिबर्टी सिनेमागृहात पाहता येतील, अशी माहिती महोत्सवाचे संचालक श्रीनिवासन नारायणन यांनी दिली.
१६ व्या ‘मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज’ (मामि) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्याकरता ‘मामि’चे संस्थापक विश्वस्त अमित खन्ना यांच्यासह आत्ता समितीवर असणारे विश्वस्त निर्माती किरण राव, दिग्दर्शक अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवने, अभिनेता फरहान अख्तर आणि महोत्सवाची सर्जनशील सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा अशी नामी मंडळी नोव्होटेलमध्ये एकत्र आली होती.
यावर्षी फ्रेंच अभिनेत्री कॅथरिन डेनिव्ह यांना आंतरराष्ट्रीय विभागात जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. तर ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
झेव्हिअर डोलान यांचा ‘मम्मी’, माईक लेह दिग्दर्शित ‘मि. टर्नर’, रिचर्ड लिंक्लेटर दिग्दर्शित ‘बॉयहूड’, योजी यामादास दिग्दर्शित ‘द लिटिल हाऊस’, जेन गोदार्द यांची ‘गुडबाय टु लँग्वेज’ अशा विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवातून गाजलेले १८५ निवडक चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार असल्याचे अनुराग कश्यप यांनी यावेळी बोलताना सांगितले.
याशिवाय, आंतरराष्ट्रीय सिनेमॅटोग्राफर ख्रिस्तोफर दोएल आणि प्रसिध्द दिग्दर्शक लेखक महमत सलेह हरून यांचे गाजलेले चित्रपटही महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत.