मी आणि गिरीश कुलकर्णी आम्ही दोघांनीही आधी जे काही केले आहे, त्यापेक्षा वेगळे काही तरी करायचा आमचा प्रयत्न असतो. ‘वळू’, ‘विहीर’ आणि ‘देऊळ’ या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही केलेल्या प्रयत्नाला रसिक प्रेक्षकांनीही दाद दिली. अर्थात हे काही ठरवून होत नाही तर सहज घडते. नव्याचा शोध घ्यायला आणि घेतलेला हा शोध नव्या पद्धतीने सादर करायला मला आवडते, असे प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.
उमेश आणि गिरीश कुलकर्णी ही जोडी ‘हाय वे’ हा नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘द्रुतगती महामार्गावर अर्थातच ‘हाय वे’वर आपण सगळ्यांनीच कधी ना कधी प्रवास केलेला असतो. या प्रवासात आपल्याला वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक स्तरावरील माणसे भेटतात आणि त्यांचे ‘चेहरे’ही वाचता येतात. ‘माणूस प्रवासाने घडतो आणि प्रवासातच कळतो’ या संकल्पनेवर आधारित असलेला ‘हाय वे’ हा मराठी चित्रपट येत्या २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्या निमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते.
काही निमित्ताने एक ते दीड वर्षे शेअर टॅक्सीने पुणे-मुंबई असा माझा प्रवास झाला. प्रवासात नवीन माणसे भेटत होती. त्यांचे चेहरे वाचत होतो. तेव्हाच माझ्या मनात ‘हाय वे’वरचा प्रवास या विषयावर चित्रपट होऊ शकतो असा विचार सुरू होता. ‘हाय वे’च्या निमित्ताने मला ती संधी मिळाली. आमच्या ‘हाय वे’ या चित्रपटाचे एक वैशिष्टय़े म्हणजे आजवरचे आमचे सगळे चित्रपट आम्ही ३५ एम. एम.च्या फिल्मवर चित्रित केलेले होते. ‘हाय वे’ हा आमचा चित्रपट डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचे जे काही फायदे आहेत त्या सगळ्याचा आम्ही येथे उपयोग करून घेतला असल्याचे उमेश म्हणाले. काही वर्षांपूर्वी हिंदीतही याच नावाचा आणि विषयावरचा चित्रपट येऊन गेला. त्याचा आणि या ‘हाय वे’चा काही संबंध आहे का? या प्रश्नावर उमेश यांनी सांगितले, तो ‘हाय वे’ आणि आमच्या ‘हाय वे’चा काहीही संबंध नाही. हिंदीतील चित्रपट प्रदर्शित झाला त्या अगोदरच आमच्या चित्रपटाच्या नावाची नोंदणी झालेली होती.
चित्रपटात हिंदीतील हुमा कुरेशी, टिस्का चोप्रा या अभिनेत्री विशेष भूमिकेत आहेत. तसेच आणखी खास वैशिष्टय़ म्हणजे बॉलीवूडमधील संगीतकार अमित त्रिवेदी यांनी ‘हाय वे’च्या गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. याविषयी उमेश कुलकर्णी म्हणाले, हुमा आणि टिस्का यांची निवड त्या बॉलीवूडमधील अभिनेत्री आहेत म्हणून केलेली नाही. या दोघीही उत्तम अभिनेत्री आहेत. मसालापटाबरोबरच काही वेगळ्या चित्रपटांमधूनही त्यांनी काम केले आहे. त्यांना चित्रपटाची कथा ऐकविली ती त्यांना आवडली आणि दोघींनीही काम करायला लगेच होकार दिला. प्रत्यक्ष चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळीही या दोघींची खूप मदत झाली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चित्रपटात त्या ज्या भूमिका/व्यक्तिरेखा साकारत असून त्यासाठी दोघीही सुयोग्य ठरल्या आहेत. बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध असलेला अमित त्रिवेदी हा एक चांगला आणि प्रयोगशील संगीतकार आहे. त्यामुळे त्याच्या संगीतचे वेगळेपण ‘हाय वे’मध्ये ऐकायला मिळेल.
आमच्या आधीच्या तीनही चित्रपटांपेक्षा ‘हाय वे’ हा वेगळा आहे. आम्हालाही चित्रपट करताना एक वेगळी ऊर्जा/शक्ती मिळाली. चित्रपट पाहणाऱ्यांनाही हा चित्रपट वेगळी ऊर्जा देईल आणि चित्रपट पाहताना त्याचा अनुभव ते घेतील. ज्या ज्या मंडळींनी ‘हाय वे’वर प्रवास केला आहे त्या प्रत्येकाला आमचा ‘हाय वे’ जवळचा आणि आपला वाटेल असा विश्वासही उमेश कुलकर्णी यांनी व्यक्त केला.