‘दी शौकिन्स’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात व्यस्त असलेल्या लिसा हेडनला एका अनपेक्षित प्रश्नाला सामोरे जावे लागले. ‘मै तेरा हीरो’ चित्रपटाचा हीरो वरुण धवनसोबतच्या तिच्या जवळकीबाबत तिला प्रश्न विचारण्यात आला असता या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देत, वरुण आणि आपल्यात तसे काही नसल्याचे तिने सांगितले. ती एव्हढ्यावरच थांबली नाही, तर वरुण आणि त्याच्या गर्लफ्रेण्डची एंगेजमेंट झाल्याचेदेखील तिने सांगून टाकले.

या खुलाशानंतर काही काळासाठी जीव भांड्यात पडलेल्या लिसाला तिच्या या विधानावरून उठलेल्या चर्चेला सामोरे जावे लागले. आपण सिंगल असल्याचे सांगण्यासाठी आणि वरुणच्या रिलेशनशिपबाबतचा खुलासा करण्यासाठी आता तिने टि्वटरचा आधार घेतला आहे. याआधी लिसा हेडन करण भोजवानी या उद्योगपतीशी २००५ पासून डेटिंग करत होती. २०१३ मध्ये या दोघांनी त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा केली होती. परंतु, या वर्षाच्या सुरुवातीला एंगेजमेंट रद्द करीत त्यांनी एकमेकांपासून फारकत घेतली. ‘दी क्वीन’ चित्रपटापासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या लिसा हेडनचा ‘दी शौकिन्स’ हा आगामी चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट पाहाण्याचे आवाहन लिसाने चित्रपटरसिकांना केले आहे.