राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी ‘कॅलेंडर गर्ल्स’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. ‘फॅशन’सारखे चित्रपट बनविणारे मधुर भांडारकर प्रत्यक्ष जीवनातील घटनांवरून प्रेरणा घेऊन, चित्रपटाच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांसमोर सादर करतात. ‘कॅलेंडर गर्ल्स’ चित्रपटासाठी त्यांनी पाच नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. चित्रपटाची कथा मॉडेल्सच्या अवतीभोवती फिरते. एका प्रसिद्ध कॅलेंडरवर त्यांचे छायाचित्र छापून आल्यानंतर त्या अचानक प्रसिद्धीच्या झोतात येतात. या चित्रपटाचे शुटिंग फक्त ४० दिवसांत पूर्ण करण्याचा मधुर भांडारकर यांचा मानस आहे. याबाबतच्या टि्वटरवरील संदेशात ते म्हणतात, आजपासून #CalendarGirls चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली! तरुणाईने भरलेल्या या चित्रपटात पाच नवीन चेहरे असणार आहेत. चित्रपटासाठी ४० दिवसांचे शेड्युल आहे. या चित्रपटाबाबत अतिशय उत्सुक असलेले मधुर भांडारकर म्हणतात, तुमच्या संपूर्ण कारकिर्दीत तुम्ही कितीही चित्रपट तयार केले असले, तरी नवीन चित्रपटाच्या शुटिंगचा पहिला दिवस हा औत्सुक्य आणि दडपण अशा संमिश्र भावनांनी भरलेला असतो. बॉलिवूडमधील कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, इशा गुप्तासारख्या अनेक अभिनेत्री दारू बनविणाऱ्या एका प्रख्यात कंपनीच्या कॅलेंडरचा चेहरा बनल्या आणि प्रसिद्धीच्या झोतात आल्या.