सध्या कर्करोगाशी झुंज देत असलेल्या अभिनेत्री मनिषा कोईरालाने आपली जीवनकथा शब्दबद्ध करायचे ठरवले आहे. या दुर्धर रोगाशी सामना करण्यासाठी मनिषानेही अध्यात्माचा आधार घेतला असून आपले विचार, अनुभव आणि आजवरचा संघर्ष लेखणीतून उतरवण्याची हीच योग्य वेळ आहे, असे वाटल्यानेच आत्मचरित्र लिहिण्याचा निर्धार केला असल्याचे फेसबुकवर म्हटले आहे.  ‘मी शर्थीचे प्रयत्न करते आहे. बाकी सगळे देवावर सोडून दिले आहे. आत्तापर्यंत माझ्या श्रध्दा, धार्मिक तत्त्वे ही केवळ विचारांत होती. पण, या कठीण प्रसंगात मला त्या विचारांची वास्तव अनुभूती मिळते आहे. आजाराशी सामना करण्याची आणि तरीही आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याची ही प्रक्रिया मला खूप काही शिकवून जाते आहे’, असे मनिषाने म्हटले आहे. ४२ वर्षीय मनिषाला कर्करोगाचे निदान झाल्यानंतर तिने यातून बाहेर पडण्यासाठी अध्यात्मिक विचारांची कास धरली आहे. याआधी प्रसिध्द मॉडेल लिसा रे हिलाही कर्करोगाने ग्रासले होते. मात्र, लिसाने मोठय़ा हिमतीने या आजारावर मात केली. एवढेच नव्हे तर लिसाने आपली अशी अध्यात्मिक साधनाही विकसित केली. लिसाकडून तिच्या साधनेची माहिती मनिषाने घेतली. या महिन्याच्या सुरूवातीलाच मनिषावर पहिल्यांदा केमोथेरपी करण्यात आली. हा सगळा संघर्ष, विचार आपण आपल्या आत्मचरित्रात मांडणार असल्याचे मनिषाने नमूद केले आहे.