‘जिद्द’ हा या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर तो शब्दसंग्रहात शोधण्यापेक्षा जिद्दीने काम करणारी माणसं बघितली तर तो अधिक चांगल्या पद्धतीने समजतो. स्वत:चे आयुष्य घडविण्यासाठी जिद्दीने पुढे जाणारी अनेक मंडळी असतात, पण आपल्याबरोबरच इतरांचे भले व्हावे यासाठी झटणारी मंडळी तशी विरळच. सरधोपट मार्गाने आयुष्य जगण्यापेक्षा वेगळ्या वाटा चोखळणाऱ्या आणि रंगभूमीची सेवा करण्याच्या उद्देशाने काम करणाऱ्या काही तुरळक मंडळींमध्ये एका व्यक्तीचे नाव आवर्जुन घ्यायलाच पाहिजे ते म्हणजे के. टी. ऊर्फ नितीन सुतार यांचे.
अकरा वर्ष घशाच्या कर्करोगावर मात करीत रंगभूमीची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा झेप घेतली, तीही जटायूप्रमाणे. ‘जटायू कल्चरल अ‍ॅकॅडेमी’ याच नावाने सुरू केलेली नाटय़संस्था त्यांनी पुन्हा एकदा कार्यान्वित केली आणि त्याच्या माध्यमातून अनेकानेक विद्यार्थी घडवले, त्यांच्यामध्ये नाटय़कौशल्य विकसित व्हावं म्हणून धडपड केली आणि त्यांच्यासाठी काही नाटय़कलाकृतींचे धूमधडाक्यात सादरीकरण केलं. के. टी. यांच्याच लेखनातून साकार झालेल्या पाच नाटकांसाठी आवश्यक असणाऱ्या शंभरहून अधिक पात्रांच्या भूमिका केवळ सत्तावीस कलाकारांच्या माध्यमातून या नाटय़कलाकृतींचे सादरीकरण करण्यात आलं आणि तेही विनामूल्य. रंगभूमीची सेवा या एकाच ध्येयाने झपाटलेले के. टी. हे नुकत्याच पुण्यात सादर केलेल्या या नाटकांचं सादरीकरण येत्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये विनामूल्य करणार आहेत.
 त्यागाचे मोठेपण आणि त्यातील पवित्रता दर्शविणारे ‘सारीपाट’हे नाटक. एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला त्याच्या गुणांपासून दूर करण्याच्या प्रयत्नाला एका शाळा मास्तरची मुलगी सुरुवात करते आणि त्यात ती यशस्वीदेखील होते. या यशस्वीतेनंतर आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या निर्णयाला तिला सामोरे जावे लागते. अशी कथा या नाटकाद्वारे मांडण्यात आली आहे.
 प्रेमाचे मोल जपणाऱ्या स्त्रीच्या मनातील वात्सल्याचे प्रकटीकरण तसंच सत्त्वशील व्यक्तींनादेखील दु:खाच्या प्रसंगांना सामोरे जावेच लागते आणि चांगुलपणाचा विजय होतो हे दर्शविणारे ‘असं का व्हावं?’ हे नाटक. अतूट मत्रीच्या धाग्याचा आधार मिळून पुन्हा माणसात येणाऱ्या तरुणाची कहाणी या नाटकात अतिशय सुंदरपणे रंगवलेली आहे.
 ‘कडवं’ या नाटकाची संस्कार आणि त्यागमय जीवनाचा दुहेरी संगम असणारी ही कथा. एक न्यायाधीशाच्या कुटुंबाच्या पडझडीत स्वतचा स्वार्थ न पाहता त्या कुटुंबासाठी त्यागी आणि सेवाभावी वृत्तीने एक नोकर आयुष्यभर झटत राहतो. फसगत झालेल्या मुलीला आधार देणाऱ्या नोकराची ही कहाणी प्रेक्षकांना अंतर्मुख करते.
एका धारिष्ठयवान स्त्रीचे एका सरंजामदाराच्या घमेंडखोर राजकुमाराशी प्रेमसंबंध जुळतात. अनावधानाने त्याचा अंकुर तिच्या पोटी वाढू लागतो. तो तिच्याशी लग्न करू शकत नाही. कालांतराने ‘ती’ आई-वडिलांना एकत्र आणून आईच्या त्यागमय आणि धारिष्ठमय जीवनाची गाथा समाजापुढे उलगडते. ‘आर्त किंकाळी’ या नाटकातून स्त्रीचे वेगळे रूप पाहायला मिळते.
‘आम्ही सारे भिकारी!’ या नावावरून अर्थबोध न होणारे पण वेगळ्याच वाटेने जाणारे हे नाटक. खुमासदार विनोद, रहस्यमयता टिकवून ठेवत हे नाटक प्रेक्षकांना हसवत राहते अगदी शेवटपर्यंत.
 सारीपाट, असं का व्हावं?, कडवं, आर्त किंकाळी,आम्ही सारे भिकारी! या  दोन अंकी नाटकांच्या या सादरीकरणात के.टीं.च्याबरोबरच त्यांनी घडविलेले आणि रंगभूमीशी यापूर्वी अपरिचित असलेल्या रुचिता देशपांडे, अनघा देशपांडे, अजय कदम, अभिजीत कोरे, मंगेश जाधव, चंद्रशेखर जोशी, हनुमान वाळेकर, कमलाकर पांचाळ, अतुल वाळके, आदिती कुलकर्णी, पूजा पारधे, अश्विनी जावळे, विजय आहेर, सतीश सूर्यवंशी, प्रशांत जगदाळे आदी कलाकारांनी आपल्यात लपलेल्या नाटय़गुणांचे प्रगटीकरण केले.
नेपथ्य संयोजनासाठी सुनील गवई, समाधान जावळे, संगीत संयोजनात सचिन खंडागळे, प्रकाश योजनेत वैभव देशपांडे, संतोष खवळे, रंगभूषा बाळ जुवाटकर, तर वेषभूषेची जबाबदारी उज्वला सुतार यांनी सांभाळली. संदीप साकोरे यांनी नाटय़ महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.
समाजात भान राखणारे आणि न राखणारे अशा वैविध्यपूर्ण स्वभावांच्या व्यक्ती. स्त्री-पुरुष नातेसंबध आणि त्यातील प्रेम आणि टोकाचे ताणतणाव या सगळ्यांचे संमिश्र दर्शन घडवत या पाचही एकांकिका एकदा तरी आवर्जुन बघाव्यात अशाच आहेत.  संकटांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा आणि जिद्द याबरोबरच एक वेगळे जग नितीन सुतार यांच्यामुळे बघायला मिळू शकते आणि अशी अमूल्य संधी न सोडणेच चांगले.