एकेकाळी ‘सखाराम बाइंडर’सारख्या समाजमानस ढवळून काढणाऱ्या नाटकांनी मराठी रंगभूमी गाजविणाऱ्या दिग्दर्शक कमलाकर सारंग आणि अभिनेत्री लालन सारंग यांचे चिरंजीव राकेश सारंग हे आता आत्याधुनिक तंत्र-मंत्र आणि दृष्टीसह ‘कलारंग’ या आपल्या वडिलोपार्जित संस्थेचे पुनरुज्जीवन करीत असून, त्यांची पहिली नाटय़निर्मिती असलेले ‘कहानी में ट्विस्ट’ हे नाटक उद्या, शनिवार २४ जानेवारी रोजी रंगभूमीवर येत आहे. सुरेश जयराम लिखित या सस्पेन्स थ्रिलर नाटकाचे दिग्दर्शन कुमार सोहोनी करीत आहेत.
दूरचित्रवाणी मालिकांच्या क्षेत्रात गेली अनेक वष्रे आपल्या वैशिष्टय़पूर्ण मालिकांनी स्वत:चे भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या राकेश सारंग यांनी ‘कलारंग’च्या पुनरुज्जीवनाद्वारे नाटय़व्यवसायातही आता उडी घेतली आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘मध्यंतरी आईने (लालन सारंग) ‘रथचक्र’ नाटक पुन्हा करण्यासंदर्भात जुळवाजुळव सुरू केली तेव्हा मला वाटले की ही जर या वयात इतक्या पॅशनने नाटक करू इच्छिते, तर आपण आपली नाटय़संस्था का पुन्हा सुरू करू नये? मलाही टीव्ही क्षेत्रात जम बसल्यावर नवे काहीतरी आव्हान स्वीकारावेसे वाटत होतेच. अर्थात ‘कलारंग’ पुन्हा सुरू करताना आजच्या नाटय़व्यवसायाचा मी गेली दोन वष्रे सखोल अभ्यास करत होतो. त्यातल्या खाचाखोचा समजून घेत होतो. त्याचबरोबर संहिताही डोळ्याखालून घालत होतो. परंतु मनासारखी संहिता सापडत नव्हती. डॉ. गिरीश ओक यांनी मला सुरेश जयराम यांचे ‘कहानी में ट्विस्ट’ हे नाटक सुचवले. मला ते आवडले अणि मग मी निर्मितीला हात घातला.’ ‘मराठी नाटकाच्या अर्थकारणासह सगळ्याच गोष्टींचा मी बारकाईने विचार केलेला आहे. मी पक्का व्यावसायिक असल्याने त्यावर आधुनिक तंत्र-मंत्राने काय मार्ग काढता येतील याचाही विचार केलेला आहे. मराठी नाटय़ व्यवसायात नव्या दृष्टीची गरज आहे, असे माझ्या लक्षात आले. ती दृष्टी घेऊनच मी या व्यवसायात उतरतो आहे,’ असे ते म्हणाले.
‘माझे वडील कमलाकर सारंग यांनी जशी विचारपूर्वक नाटय़निर्मिती केली तशीच भावनात्मकदृष्टय़ाही काही नाटकांची निर्मिती केलंी. मी या दोन्हीचा समतोल साधण्याचा प्रयत्न करणार आहे. गंभीर आशयसंपन्न नाटकांबरोबरच निखळ करमणूक करणारी नाटकेही ‘कलारंग’ तर्फे काढली जातील. या नाटकासोबतच माझ्या पुढच्या दोन-तीन नाटकांच्या योजनाही तयार आहेत. पूर्ण तयारीनिशी मी या क्षेत्रात उतरतो आहे,’ असे ठाम विश्वासाने त्यांनी सांगितले.
‘कहानी में ट्विस्ट’ हे सस्पेन्स थ्रिलर नाटक असून डॉ. गिरीश ओक, सौरभ गोखले, प्राजक्ता दातार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे, तर  संगीताची बाजू राहुल रानडे सांभाळीत आहेत. वेशभूषा संगीता सारंग यांची आहे. उद्या, शनिवार २४ जानेवारीला दुपारी ३.३० वाजता शिवाजी मंदिर येथे ‘कहानी में ट्विस्ट’चा शुभारंभाचा प्रयोग सादर होणार आहे.