प्रेमाची अनेकविधं रूपं आणि पैलू रसिकांसमोर उलगडण्याचा नवा प्रतिभाविष्कार नाटककार-दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांनी केला आहे. ‘प्रेम रंगी रंगुनी’ हा प्रेमाच्या अनोख्या मैफलीचा हा आविष्कार रंगभूमीवर आला असून शुभारंभाचा प्रयोग दीनानाथ नाटय़गृहात नुकताच झाला.
प्रियकर-प्रेयसीचे नाते उलगडण्याबरोबरच, प्रेमाच्या विविध छटा, मित्रप्रेम, मातृप्रेम, पती-पत्नी यांच्यातील प्रेम, माणुसकीवरील प्रेम, जगण्यावरील प्रेम अशा विविध छटा कविता, संगीत, नाटय़ अशा संगमातून उलगडण्याचा निराळा प्रयत्न आनंद म्हसवेकर यांनी ‘प्रेम रंगी रंगुनी’ या नव्या नाटय़प्रयोगाद्वारे केला आहे.
जिव्हाळा आणि विप्रा क्रिएशन या संस्थांतर्फे हा प्रयोग रंगभूमीवर येत असून निर्मिती संध्या रोठे यांनी केली आहे. प्रेम या विषयावरील नाटय़प्रवेश, जुनी-नवी प्रेमगीते यांची सांगड घालून निराळ्याच पद्धतीचे सादरीकरण यात केले जाणार आहे. गायक-नट अमोल बावडेकर गायक-निवेदकाच्या भूमिकेत ऊसन रमेश राणे आणि दीप्ती भागवत हे कलावंतही गाणी सादर करतील. सुभाष मालेगावकर यांचे संगीत संयोजन असून नेपथ्याची जबाबदारी कृपेश राऊत यांनी पेलली आहे. प्रेमकविता, प्रेमविषयक भावस्पर्शी संवाद, रसिकांच्या मनात रुंजी घालणारी प्रेमगीतं, नाटय़प्रवेश या माध्यमातून प्रेक्षकांच्या अंतरंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांनी या प्रयोगातून केला आहे.