unnamed1मराठी सिनेसृष्टीतील सन्माननीय संस्कृती कला दर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळ्याची नुकतीच सांगता झाली.  नाट्य आणि चित्रपट अशा दोन विभागात विभालेल्या या महोत्सवात सर्वात्कृष्ट ५ नाटक आणि १० चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. या महोत्सवातील  नामांकन यादी १५ एप्रिल रोजी जाहीर होणार असून पारितोषिक वितरण सोहळा २६ एप्रिल रोजी मुंबईत  होणार आहे. या सोहळ्यातील चित्रपट महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर उपस्थित होते.  मराठी सिनेमा सातासमुद्रापार नेण्यासाठी आम्ही एकजुटीने प्रयत्न करू आणि ४०० कोटींचा मोबदला मिळवून देणारी मराठी इंडस्ट्री लवकरच ८०० कोटींचा पल्ला देखील गाठेल त्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू त्याचबरोबर संस्कृती कला दर्पण गौरव रजनी सारखे महोत्सव  सातासमुद्र पार नेऊ असा दृढ विश्वास अ.भा.चि.म अध्यक्ष पाटकर यांनी संस्कृती कला दर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सवात बोलून दाखवला. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची देखील विशेष उपस्थिती होती. संस्कृतीचा हा उपक्रम अतिशय स्त्युत्य आहे. तसेच सर्वोत्कृष्ट कलाकृतींना योग्य सन्मान मिळवून देणाऱ्या या व्यासपीठाला खूप शुभेच्छा देतो. याशिवाय मराठी चित्रपटाला प्राइम टाईम चा बोनस मिळवून देण्याच्या निर्णयाबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतीक  मंत्री विनोद तावडे यांचे आभार मानतो अशी प्रांजळ प्रतिक्रिया खोपकर यांनी व्यक्त केली.  मराठी नाटक आणि चित्रपटांचा यथोचित सन्मान संस्कृती कला दर्पण संस्थेच्यावतीने होत असल्याने सर्वच स्तरावर या सोहळ्याचे स्वागत केले जात असल्याची भावना संस्कृती कला दर्पणचे संस्थापक चंद्रशेखर सांडवे आणि अध्यक्ष अर्चना नेवरेकर यांनी मांडली.  या वर्षीचा सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या ” लोकमान्य” या चित्रपटाने चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली होती. त्यांनतर ‘गुरु पोर्णिमा’ , ‘विटी दांडू’ ‘ एलिझाबेथ एकादशी’, ‘आणि सध्याचा सगळ्यात चर्चेत असलेल्या ‘काकण’ या चित्रपटाला रसिक प्रेक्षकांची विशेष पसंती लाभली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘शटर’  राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘एक हजाराची नोट’  ‘तिचा उंबरठा’, ‘कॅन्डल मार्च’, ‘रमा माधव’ आणि ”लय भारी’ हे चित्रपट दाखवण्या आले. चित्रपट परीक्षकमंडळात अभिनेत्री स्मिता जयकर, निर्माती कांचन अधिकारी, रेखा सहाय, आणि अमृता राव या मान्यवरांचा सहभाग होता. तसेच नाट्य परीक्षण विभागात प्रमोद पवार, शकुंतला नरे, अर्चना पाटकर यांनी परीक्षणाची जबाबदारी सांभाळली होती.