महाराष्ट्रातील लोककला आणि लोकसंस्कृती यांचे जतन व संवर्धन करण्याच्या मुख्य उद्देशाने इंडियन नॅशनल थिएटर लोकप्रयोज्य कला संशोधन केंद्र गेली ३५ वर्षे काम करत आहे. राज्यातील लोककला, आदिवासी कला, कूळधर्म, कुलाचार याविषयी संशोधन करून आयएनटीचे कला केंद्र असे कलाप्रकार शहरातील रसिक आणि अभ्यासकांसाठी आयोजित करत असते. याचाच एक भाग म्हणून १४ फेब्रुवारी रोजी मुंबईत गिरगाव येथे निरंजन भाकरे यांच्या सोंगी भारुडाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे खास वैशिष्टय़ म्हणजे भाकरे यांनी या प्रयोगासाठी स्वत: ७५.१ मीटर इतका घेर असलेला पायघोळ झगा शिवला असून तो घालून भाकरे हा प्रयोग करणार आहेत. कदाचित हा जागतिक विक्रम ठरणार आहे. गोंधळमहर्षी राजारामभाऊ कदम यांचे ‘जांभूळ आख्यान’, शंकरराव धामणीकर यांचे ‘खंडोबाचे लगीन’ हे अनुक्रमे गोंधळ व जागरण या लोककलांवर आधारित लोकनाटय़े तसेच शाहीर विठ्ठल उमप यांच्या अभिनयातून साकारलेले ‘लोकमहाभारत’, ‘खंडोबाचं लगीन’ हे प्रयोगही आयएनटीने सादर केले होते. शाहीर सम्राट पठ्ठे बापूराव विभूते, लोकशाहीर विठ्ठल उमप, लावणी नृत्यांगना आदी लोककलावंतांना आयएनटीनेच परदेशात सर्वप्रथम सादर केले होते. सोंगी भारूड सादर करणारे भाकरे यांना काही वर्षांपूर्वी मुंबईत आपली कला सादर करण्याची संधीही आयएनटीने दिली होती. भाकरे गेली १५ वर्षे सोंगी भारुडाचे प्रयोग सादर करत आहेत. आपल्या कार्यक्रमात भाकरे हे सतत नवीन काहीतरी करत असतात. १४ फेब्रुवारी रोजी मुंबईत गिरगाव येथे सायंकाळी सहा वाजता आयएनटी-आदित्य बिर्ला सेंटर, मनपा मार्केट, बाबुलनाथ मंदिराजवळ, गिरगाव चौपाटी येथे सोंगी भारुडाचा आणखी एक प्रयोग सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. सोंगी भारुडाच्या या आगळ्या प्रयोगाचे साक्षीदार होण्यासाठी लोककला अभ्यासक, रसिक प्रेक्षकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन इंडियन नॅशनल थिएटर संशोधन केंद्राचे उपसंचालक रामचंद्र वरक यांनी केले आहे.