प्लाझा ते प्रभात (पुणे आणि कोल्हापूर) असा फिरणारा अथवा दाखवला जाणारा मराठी चित्रपट आता राज्याबाहेरील बडोदा, इंदूर, भोपाळ अशा काही मराठी भाषिकांची वस्ती असणाऱ्या लहान-मोठ्या शहरांतही प्रदर्शित होवू लाहला आहे आणि त्यातूनही काही किस्से जन्माला आले… ‘लय भारी’ कर्नाटकमधील बंगलोर शहरात प्रदर्शित करताना फारशा अपेक्षा नव्हत्या पण पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्याच दिवशी दहापट प्रतिसाद, तर तिसऱ्या दिवशी त्यापेक्षाही अडिचपट… तात्पर्य, मराठी चित्रपट असा दूरवरच्या मराठी रसिकांपर्यंत पोहचवण्यात हित आहे हेच यातून सिध्द होते.
हैदराबादला तर कमालच झाली, दिग्दर्शक निशिकांत कामत शरद केळकरला घेऊन प्रेक्षकांसह ‘लय भारी’ पाहायला गेला. तेथे साडेसहाशे प्रेक्षकसंख्येचे चित्रपटगृह हाऊसफुल्ल असल्याने निशिकांत यांना तिकिट मिळवताना ‘मी या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.’ हे समजून सांगावे लागले, तेव्हा कुठे त्यांना प्लॅस्टिकच्या दोन खुर्च्या मिळाल्या, पण मध्यंतर होण्यापूर्वीच चित्रपटगृहाचा मॅनेजर येऊन म्हणाला, तुम्ही येथून बाहेर पडा अन्यथा संग्रामच्या खलनायकीवरून शरद केळकरला धक्काबुक्की होईल…
मराठी चित्रपटाला भरपूर प्रेक्षकवर्ग आणि त्याचे तेवढेच भरभरून प्रेम मिळते, हेच या उदाहरणावरून स्पष्ट होते. हे सगळचं ‘लय भारी’ म्हणायचे.