दंगावाली स्टोरी
‘दुनियादारी’ या गाजलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा प्रेमकथा सांगणारा नवा चित्रपट, आधीच्या गाजलेल्या चित्रपटातील बहुतांश कलावंत, संगीत यामुळे ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली खरी. चित्रपटाच्या शीर्षकातून धमाल प्रेमकथा पाहायला मिळणार ही अपेक्षा ठेवून प्रेक्षक चित्रपटगृहात जातो. पण ही अपेक्षा चित्रपटकर्त्यांनी पूर्ण केलेली नाही.  हिंदी चित्रपटांतून पाहिलेलीच प्रेमकथा आणि रोमिओ-ज्युलिएटची प्रेमकहाणीच पाहायला मिळते, नवे काही चांगल्या मांडणीसह पाहायला मिळेल ही अपेक्षा फोल ठरते. सर्व प्रमुख कलावंतांचा अभिनय ही मात्र या चित्रपटाची जमेची बाजू नक्कीच आहे.
अमर हा हिंदूू तरूण आणि आलिया ही मुस्लिम तरूणी यांच्या प्रेमाची कथा यात मांडली आहे. हिंदू-मुस्लिम जोडीच्या प्रेमाला १९९२ सालातील मुंबई दंगलीची पाश्र्वभूमी आहे. अमानुल्ला चाळीत राहणारी आलिया, तिचा भाऊ कादर, तिचे पोलीस हवालदार वडील आणि तिची अम्मी यांचे कुटूंब आहे. तर शेजारच्याच गणेश नगर चाळीत राहणारा  पश्या दादा, त्याची बायका नंदिनी आणि पश्यादादाचा लहान भाऊ अमर यांचे कुटुंब आहे. कादर आणि पश्या यांची जीवश्चकंठश्च मैत्री आहे, ती सारी या दोन्ही चाळींना ठाऊक आहे. हिंदी चित्रपटात कित्येकवेळा दाखविल्यानुसार हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने नांदत आहेत आणि मुंबईतील दंगल पेट घेतल्यानंतर दोन्ही चाळींमध्ये उभा दावा निर्माण  होतो. त्यातच आलियाचे वडील आलम या पोलीस अधिकाऱ्याशी आलियाचा विवाह ठरवतात आणि प्रेमकथेत ‘सॉलिड ट्विस्ट’ वगैरे येतो.  
रोमिओ-ज्युलिएटची प्रेमकहाणी आणि  आतापर्यंत कित्येकदा प्रेक्षकांनी हिंदीच्या रूपेरी पडद्यावर पाहिलेली प्रेमकथापटांची कथानके याचा या चित्रपटाच्या लेखनावर खूप प्रभाव असल्याचे जाणवते. प्रेमकथापट म्हणताना दंगल, हाणामारी आणि कादर-पश्या यांच्यातील वैमनस्य, कानांवर आदळणारी दाक्षिणात्या चित्रपटांच्या धर्तीवर रचण्यात आलेले संगीत आणि गाणी यामुळे प्रेमकथा मागे पडते. दंगल उरते. चित्रपट पाहताना बऱ्याच ठिकाणी पुढे काय घडणार याचा अंदाज प्रेक्षकाला येतो त्यामुळेही त्याचा रस निघून जातो.
हिंदू-मुस्लिम तरुण-तरुणींचे प्रेम यापूर्वीही हिंदी चित्रपटातून अनेकदा पाहिलेले असले तरी काही चित्रपटांनी प्रेमकथा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्या. अशीच अपेक्षा या चित्रपटाच्या दिग्दर्शकाकडून प्रेक्षकांची होती. प्रेमकथा आणि श्रवणीय संगीत हे प्रेक्षकांनाही हवे असते. या चित्रपटातही अनेक गाणी आहेत परंतु प्रेमकथेला अनुसरून चाली बांधलेल्या नाहीत. दाक्षिणात्य चित्रपटांत असतात त्याप्रमाणे गाणी, शब्द, संगीत हे कानांना सुरेल न वाटता कानठळ्या बसविणारे ठरले आहे. जरा जरा.. हे गाणे मात्र श्रवणीय आहे. तसेच या गाण्याचे चित्रीकरणही प्रेक्षणीय झाले आहे. नंदिनी ही बिनधास्त, बेधडक तरूणी उर्मिला कानेटकरने मस्त साकारली आहे. चाळीतली असल्यामुळे तिच्या तोंडी असलेले संवाद, शिव्या यामुळे ती भाव खाऊन जाते.  स्वप्नील जोशीने साकारलेला अमर आणि सई ताम्हणकरने साकारलेली आलिया यांच्यातील केमिस्ट्री दिग्दर्शकाने चांगल्या प्रकारे टिपली आहे. आलियाने अमरला स्टूपिड असे संबोधणे आणि अमरच्या तोंडी ‘आओ ना यार फिर’ हे संवाद प्रेक्षकाला आवडतात. अमर ही व्यक्तिरेखा पुष्कळअंशी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटातील राज या शाहरूख खानने साकारलेल्या व्यक्तिरेखेशी मिळतीजुळती आहे. सई ताम्हणकर मुस्लिम तरूणीच्या भूमिकेत चपखल बसली आहे. सई, स्वप्नील यांच्याबरोबरच उपेंद्र लिमयेने साकारलेला कादरभाई, आलियाच्या अब्बूच्या भूमिकेतील नागेश भोसले, आलमच्या भूमिकेतील चिन्मय मांडलेकर व अन्य सर्व प्रमुख कलावंतांचा उत्तम अभिनय हीच या चित्रपटाच्या जमेची बाजू आहे. प्रेमकथा आणि दंगल या दोन गोष्टींचा संबंध दाखविताना दिग्दर्शक कोणताच मुद्दा मांडत नाही. मुद्दा न मांडता दंगल सुरूच राहते त्यामुळे प्यार कमी आणि दंगा जास्ती अशी चित्रपटाची ‘स्टोरी’ अर्धीकच्ची राहिली आहे. त्यामुळे दंगावाली स्टोरी असेच म्हणावे लागेल.
 प्यारवाली लव्हस्टोरी
निर्माते – रेखा जोशी, इंदर कपूर, दीपक राणे
दिग्दर्शक – संजय जाधव
छायालेखक – प्रसाद भेंडे
सहलेखक – तपन भट्ट, आशिष पाथरे
पटकथा – अरविंद जगताप
संवाद – आशिष पाथरे
संगीत – अमितराज, पंकज पडघन, समीर साप्तीसकर
कलावंत – स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर-कोठारे, चिन्मय मांडलेकर, नागेश भोसले, समीर धर्माधिकारी, उपेंद्र लिमये, उदय सबनीस, उदय टिकेकर, भारती आचरेकर, इला भाटे