मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाही.. मराठी रसिकांनी मराठी चित्रपट पाहायला हवेत.. अशी रडगाणी नेहमीच अधूनमधून ऐकायला मिळत असतात. पण ती खोटी असतात, चांगल्या मराठी चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटापाठोपाठ नुकताच शुक्रवारी झळकलेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाचे खेळ हाऊसफुल सुरू असून ‘प्रकाश आमटे’ने सहा आठवडय़ांत १२ कोटी रुपयांचा, तर ‘एलिझाबेथ’ने अवघ्या तीन दिवसांत अडीच कोटींचा गल्ला जमवला आहे. गेल्या काही महिन्यांपासून एकामागोमाग एक हिंदी सिनेमे प्रेक्षकांच्या प्रतिसादाअभावी आपटत असताना चांगला आशय आणि दर्जेदार मांडणीच्या जोरावर मराठी चित्रपटांनी तिकीट खिडकीला आधार दिला आहे.
डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे या दाम्पत्याने गडचिरोली जिल्ह्य़ातील हेमलकसा या आदिवासी आणि अतिदुर्गम भागात जे काम उभे केले त्याचे दर्शन ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे- द रियर हिरो’ चित्रपटात घडते. आमटे दाम्पत्याने अनेक अडचणींना तोंड देत, संकटांवर जिद्दीने मात करीत केलेल्या संघर्षांची कहाणी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली. अ‍ॅड. समृद्धी पोरे यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. आता सहाव्या आठवडय़ातही संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल १०० चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या प्रतिसादात हा चित्रपट सुरू आहे.
92तर परेश मोकाशी दिग्दर्शित ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटात नाव असलेले कोणीही मोठे कलाकार नाहीत. गरीब कुटुंबातील मुलांचे भावविश्व यात मांडले आहे. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ती सावरण्यासाठी मुलांनी लावलेला हातभार, असा विषय थोडय़ा वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आला आहे. शुक्रवारपासून बहुतांश चित्रपटगृहांतील सर्व खेळ हाऊसफुल झाले आहेत. दोन दिवस आधी प्रयत्न करूनही सोमवारच्या खेळाचे तिकीट मिळणे रसिकांना कठीण जात आहे. आजमितीस राज्यात १८० चित्रपटगृहांत तो सुरू आहे.

मराठी चित्रपटांसाठी ही आनंदाची बाब
हे दोन्ही चित्रपट व्यावसायिक नाहीत; तरीही त्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय, ही मराठी चित्रपटांसाठी आनंदाची बाब आहे. प्रेक्षकांना आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला कोणीही गृहीत धरू नये, हे या दोन्ही चित्रपटांनी सिद्ध करून दाखविले आहे.
निखिल साने, ‘एस्सेल व्हिजन’च्या मराठी चित्रपट विभागाचे प्रमुख आणि निर्माते