धावपळीचे जीवन, माहिती व तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि एकूणच बदललेली जीवनशैली याचा परिणाम समाजाच्या सर्वच क्षेत्रांत झालेला पाहायला मिळतो. कुटंब व्यवस्था, संस्कार यात जसे बदल झाले तसे बदल कलेच्या क्षेत्रातही झाले आहेत. चित्रपट, नाटक, दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम, संगीत आणि कलेच्या विविध क्षेत्रांत झालेले हे बदल सर्वानी स्वीकारलेही आहेत. काळानुरूप हे बदल अपरिहार्य असून या बदलाचे पडसाद मराठी नाटय़सृष्टीतही पाहायला मिळत आहेत. एकेकाळी मराठी नाटकात पाच किंवा त्यापेक्षा जास्त कलाकार असायचे मात्र आता हे प्रमाण कमी झाले आहे. ‘एक, दोन, तीन, चार मराठी नाटकात मोजके कलाकार’ असे चित्र सध्या रंगभूमीवर दिसत आहे.
एकेकाळी संगीत नाटकांनी मराठी रंगभूमी समृद्ध केली. संगीत नाटकांना मोठय़ा प्रमाणात प्रेक्षक प्रतिसाद मिळत होता. रात्री सुरू झालेले संगीत नाटक पहाटेपर्यंत चालायचे. नाटकात दहा ते पुढे कितीही गाणी असायची आणि रसिक श्रोते व प्रेक्षकांच्या मागणीनुसार एखाद्या नाटय़पदाला एकदा, दोनदा नव्हे तर अनेकदा ‘वन्समोअर’ घेतले जायचे. काळानुरूप संगीत नाटकांची लोकप्रियता कमी झाली. आताही नाटकांची लांबी व त्यातील गाण्यांची संख्या कमी करून संगीत नाटके सादर होतात. हा बदलही लोकांनी स्वीकारला. पूर्वीच्या काळी अत्याधुनिक ध्वनिवर्धक (माइक) नसल्याने रंगमंचावर वावरणारे कलाकार मोठय़ा आवाजात (कधी तारस्वरातही) आपले संवाद म्हणत असत. शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकांपर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे आणि त्याला नाटकातील संवाद नीट ऐकू यायला पाहिजेत, हा उद्देश त्यामागे होता. आता अत्याधुनिक ध्वनिवर्धकामुळे मोठय़ा आवाजात संवादफेक करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. असाच प्रकार आता नाटकातील कलाकारांच्या संख्येच्या बाबतीत झाला आहे, असे म्हणता येईल.
नाटक म्हटले की अनेक कलाकार हे पूर्वीचे समीकरण आता बदलले आहे. एक, दोन किंवा तीन असे अगदी मोजकेच कलाकार घेऊन मराठी व्यावसायिक रंगभूमीवर नाटकांचे प्रयोग सध्या सुरू आहेत. ज्या ‘दोन स्पेशल’ या नाटकाचा बोलबाला सध्या जोरात सुरू आहे त्या नाटकात फक्त जितेंद्र जोशी, गिरिजा ओक, रोहित हळदीपूर असे फक्त तीन कलाकार आहेत. भद्रकाली प्रॉडक्शनच्या ‘समुद्र’ आणि ‘जस्ट हलकं फुलकं’ या चांगला प्रेक्षक प्रतिसाद मिळत असलेल्या नाटकामध्येही दोन ते तीन कलाकार आहेत. स्पृहा जोशी व चिन्मय मांडलेकर हे ‘समुद्र’मध्ये तर भारत गणेशपुरे, सागर कारंडे, अनिता दाते असे तीन कलाकार ‘जस्ट हलकं फुलकं’मध्ये आहेत. ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकातही शशांकसह लीना भागवत आणि मंगेश कदम असे तीनच कलाकार आहेत. तीच गोष्ट याच तेजश्री प्रधान हिच्या ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाची आहे. नाटकात तिच्यासह प्रशांत दामले, नीता पेंडसे व पराग डांगे असे चार कलाकार आहेत.
‘यू टर्न’ या नाटकात तर अवघे दोन कलाकार आहेत. पण, तरीही या नाटकावर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची मोहोर उमटविली आहे. डॉ. गिरीश ओक व इला भाटे हे दोन समर्थ कलाकार नाटक आपल्या अभिनयाच्या ताकदीवर पेलून नेतात. आगामी ‘ग्रेसफुल’ नाटकातही आदिती सारंगधर व आशा शेलार या दोघीच संपूर्ण नाटक ग्रेसफुली साकारणार आहेत. अभिनेत्री रिमा आणि विक्रम गोखले हे पहिल्यांदा एकत्र काम करत असलेले नाटक ‘के दिल अभी भरा नही’ लवकरच रंगभूमीवर दाखल होणार आहे. त्यातही या दोघांसह जयंत सावरकर, बागेश्री जोशीराव असे मोजके कलाकार आहेत.
दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, मराठी चित्रपट आणि रंगभूमीवर सुरू असलेली नाटके यात काम करणारे बहुतांश कलाकार या तिन्ही माध्यमांत काम करणारे आहेत. मालिका आणि चित्रपटाचे चित्रीकरण सांभाळून नाटकाचे प्रयोगही हे कलाकार करत आहेत.  या सगळ्यांना आणि त्यांच्या तारखांना सांभाळण्याची तारेवरची कसरत निर्माता व दिग्दर्शकांना करावी लागते. त्यामुळे नाटकात मोजकेच कलाकार असतील तर त्या सगळ्यांच्या वेळा व तारखा सांभाळणे तेवढे कठीण जात नाही. नाटकात कलाकार जेवढे कमी तेवढा त्याच्या मानधनावरचा खर्चही कमी होतो आणि आर्थिक गणितेही सोपी होतात. तसेच एखाद्या नाटकात मोजकेच कलाकार असतील तर नाटकाचा निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांसाठीही ते मोठे आव्हान असते. नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे काम हे नाटकातील त्या मोजक्या कलाकारांनाच पार पाडायचे असते. त्यामुळे हे आव्हान पेलताना काही वेळा नवीन प्रयोगही करता येतात. म्हणूनच सध्या मोजकी पात्रे घेऊन नाटक सादर करण्याकडे नाटय़निर्माते, दिग्दर्शकांचा कल दिसून येत आहे.