महाविद्यालयात शिकवण्याचे काम करीत असताना आपल्या गावातील एका समस्येकडे गांभीर्याने पाहून त्यावर चित्रपट तयार करून ती समस्या जगासमोर मांडण्याचे आव्हान मुंबईतील एका प्राध्यापकाने स्वीकारले. या आव्हानाचे विविध स्तरांवरून कौतुक झाले असून त्यांचा चित्रपट आणि दक्षिण आफ्रिकेकडून ऑस्करवारीसाठी गेला आहे. या चित्रपटाला नामांकन मिळते आहे का, याबाबत आता उत्सुकता लागली आहे.
एमडी महाविद्यालयातील इंग्रजी साहित्य या विषयाचे प्राध्यापक डॉ. किशन पवार यांनी त्यांच्या गावात घडलेल्या एक सत्य घटना कथेचा गाभा ठेवून ‘तारा’ नावाची कथा २००८ मध्ये लिहिली. ही कथा त्यांचे मित्र कुमार राज यांना आवडली. या कथेवरून एक चित्रपटनिर्मिती करावी, असा विचार राज यांनी मांडला आणि पुढील काम सुरू झाले. नांदेड येथील किनवट तालुक्यातील बंजारा समाजातील ही घटना असून यामध्ये एका गरोदर महिलेला संशयित धरून गावातून बाहेर काढले जाते. याभोवती गुंफलेली ही कथा असून गावातील ही महिला कशी मी निर्दोष असून नवऱ्याला धडा शिकवते, असा शेवट करण्यात आला आहे. हा चित्रपट कुमार राज यांनी निर्मिती आणि दिग्दर्शित केले आहे. तर रेखा राणा या मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट जुलै २०१३ मध्ये एल्फिन्स्टन येथील इम्पिरिअर चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. यानंतर वर्षभर हा चित्रपट तेथे चालला. या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ३५ पुरस्कार मिळाले असून हा चित्रपट २५ महोत्सवांमध्ये दाखविण्यात आला. यानंतर हा चित्रपट नुकताच दक्षिण आफ्रिकेतील टागो येथील आंतरराष्ट्रीय चित्रपटगृहात दाखविण्यात आला. यानंतर हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतर्फे ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी पाठविण्यात आला आहे, असे डॉ. पवार यांनी स्पष्ट केले. आता या चित्रपटाला अंतिम पाचमध्ये नामांकन मिळावे, अशी सर्वाची इच्छा असून प्राध्यापकांच्या सन्मानार्थ एमडी महाविद्यालयात नुकताच एका चर्चेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये लेखक व दिग्दर्शकाने चित्रपटाचा संपूर्ण प्रवास विद्यार्थ्यांपुढे कथन केला. याचबरोबर हा चित्रपट महाविद्यालयातर्फे ग्रामीण भागात होणाऱ्या एनएसएसच्या शिबिरांमध्ये दाखविला जातो. जेणेकरून तेथील महिलांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.